

जळगाव : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाचा अनोखा अनुभव देणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सातपुडा जंगल सफारीला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात पर्यटकांनी सफारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने वन विभागाने समाधान व्यक्त केले आहे. रावेर तालुक्यातील पाल अभयारण्यात २ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेल्या या जंगल सफारीचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले होते. सातपुड्याचा निसर्ग, संस्कृती आणि जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी कुटुंबासह भेट देण्याचे आवाहन त्यांनी
उद्घाटनप्रसंगी केले होते. त्याला पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. सुमारे २७किलोमीटर लांबीच्या आणि ३,३३९ हेक्टर क्षेत्रफळाच्या या जंगल सफारीमध्ये पर्यटकांना गंगोत्री धबधबा, माकडदरी धबधबा, इको हट पॉइंट तसेच वाघ डोह परिसराचे आकर्षण अनुभवता येते. याशिवाय विविध प्रजातींचे पक्षी आणि इतर वन्यजीवांचेही दर्शन पर्यटकांना घडते. त्यामुळे ही सफारी निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. सातपुड्यात जंगल सफारी यशस्वीपणे सुरू होऊ शकते, हे सिद्ध झाले असून आता येथील जैवविविधतेचे संवर्धन, जंगलाचे हरित वैभव पुनस्र्थापित करणे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणे, हे वन विभागासमोरील पुढील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
समाधान पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, यावल वन विभाग
वर्षभरात ४४४ सफारी फेऱ्या पूर्ण
वन विभागाकडे सध्या सफारीसाठी पाच विशेष वाहने असून १८ प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक व चालक कार्यरत आहेत. एका सफारीसाठी सुमारे अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. वर्षभरात ४४४ सफारी फेऱ्या पूर्ण झाल्या असून शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची विशेष गर्दी होत असल्याचे वन विभागाने सांगितले. वाढत्या प्रतिसादामुळे सफारी वाहनांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.