

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. २५) प्रतिक्रिया देत या निर्णयाला "लोकशाहीचा विजय" असे संबोधले. नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दबावामुळे हा राजीनामा झाला असून, हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या ताकदीचा मोठा विजय असल्याचे पवार यांनी म्हटले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे कौतुक करत शरद पवार यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली.
शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार अखेर आज केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला."
ते पुढे म्हणाले, "दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे."
"देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते," असेही शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांनी युवकांना दिलेल्या नैतिक आणि संसदीय पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचे आभार मानले.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा शांततापूर्ण आंदोलन करणारे विद्यार्थी, आंदोलक आणि विरोधी पक्षांनी सातत्याने टाकलेल्या दबावानंतरच झाला आहे. #NEETUG प्रकरणात ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक आंदोलनकर्त्याचे मी अभिनंदन करते. मात्र, येथेच हा लढा संपता कामा नये. आम्ही खऱ्या अर्थाने उत्तरदायित्व निश्चित करण्याची, शिक्षण व्यवस्थेत सर्वंकष सुधारणा करण्याची आणि नीट प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा होण्याची मागणी करतो. असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
‘मन की बात’ नाही तर ‘जन की बात’ ऐकावीच लागेल - रोहित पवार
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली. हा राजीनामा देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा परिणाम असल्याचे सांगत, अन्यायाविरोधात एकत्र लढल्यास कितीही अहंकारी सरकारला झुकवता येते, हे या आंदोलनाने सिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले.