फुटीवर शिक्कामोर्तब; ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला

संसदीय पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे ९ पैकी ६ खासदारांनी पाठ फिरवल्याने ठाकरे गटाच्या फुटीवर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले.
फुटीवर शिक्कामोर्तब; ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला
फुटीवर शिक्कामोर्तब; ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला
Published on

मुंबई : संसदीय पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे ९ पैकी ६ खासदारांनी पाठ फिरवल्याने ठाकरे गटाच्या फुटीवर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. बंडखोरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, प्रत्येक बंडखोराला ११ पोलिसांची ‘वाय प्लस’ सुरक्षा पुरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाचे शिंदेसेनेत आधीच विलीनीकरण झाले असल्याचे वृत्त असून पडद्यामागे याबाबतच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. या वेगवान हालचालींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून ‘त्या’ खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तर फुटलेल्या खासदारांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघांतील संतप्त शिवसैनिकांनी निदर्शने केली असल्याचे वृत्त आहे.

दिल्लीत गुरुवारी सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे हे केवळ तीन लोकसभा खासदार उपस्थित होते. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा व्हीप जारी केला होता.

जून २०२२ नंतर गेल्या चार वर्षांतील ठाकरे गटातील ही सर्वात मोठी फूट आहे. शिंदे यांनी ठाकरेच्या गटाच्या विरोधातील 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करून दाखवत उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली आहे. ठाकरे गटाने आता बंडखोर खासदारांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि बंडखोर खासदारांमधील निर्णायक लढाई ही लोकसभा अध्यक्षांसमोर आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जाणार आहे.

संसदीय पक्ष बैठकीला सहा खासदार अनुपस्थित

पक्षाच्या बंडखोर खासदारांना रोखण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गुरूवारी सकाळी ११ वाजता संसदेतील कार्यालयात संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी पक्षाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी तीन ओळींचा पक्षादेश (व्हीप) जारी केला होता. त्यानुसार ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यासह लोकसभेतील खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. संसदीय पक्षाची बैठक जवळपास तास -दीड तास चालली. या बैठकीला ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या दोघांसह सहा खासदारांनी आपली बंडखोरीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या लोकसभेतील दोन तृतीयांश खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीला उपस्थित न राहणे हा पक्षद्रोहच...

पक्षात फूट पडल्याचे सिद्ध झाल्यानंतर ठाकरे गटाने आता पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांवरील कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेची माहिती दिली. आज सकाळी ११ वाजता बोलावण्यात आलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला मी स्वतः अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत उपस्थित होतो. मात्र, पक्षाचा व्हीप बजावूनही ६ खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. बैठकीला उपस्थित न राहणे हा थेट पक्षद्रोह आहे. त्यामुळे या सर्व खासदारांना 'कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी संबंधित खासदारांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

बंडखोरांनी मतदारसंघात जाऊन दाखवावे...

बंडखोर खासदारांवर टीका करत संजय राऊत म्हणाले, ‘त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावे. जर ते तिथे गेले तर त्यांना सैन्य घेऊन जावे लागेल’. त्यांनी पुढे दावा केला की, यापुढे या खासदारांना सुरक्षा आणि सरकारी संरक्षणाच्या आधारेच फिरावे लागेल.

फुटीवर शिक्कामोर्तब; ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला
Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा

‘ते’ चोरी का लपवत आहेत?

यावेळी सावंत यांनी जनता दलाच्या शरद यादव यांच्यावर झालेल्या कारवाईचा दाखला दिला. यादव यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर भाषण केले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाने लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र जाहीर करावे. चोरी करणारे आपली चोरी का लपवत आहेत? असा सवाल त्यांनी केला. व्हीप लागू होत नाही, असे म्हणणे हा अडाणीपणाचा कळस आहे. महाराष्ट्राची जनता हा राजकीय बाजार कधीही सहन करणार नाही, असेही सावंत यांनी बजावले.

बैठकीला गैरहजर राहणे म्हणजे ‘पक्षद्रोह’च

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, ‘पक्षाचा आदेश सर्व खासदारांना मिळाला होता. तरीही काही सदस्य बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आम्हाला वाटते हा पक्षद्रोह आहे’. त्यांनी सांगितले की, अनुपस्थित राहिलेल्या सर्व खासदारांना आजच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. ‘संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला नोटीस मिळेल आणि सात दिवसांच्या आत त्यांना उत्तर द्यावे लागेल’, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा अध्यक्षांनाही पत्र पाठवणार

या खासदारांवर पुढे काय कारवाई होणार, याबाबत विचारले असता सावंत म्हणाले, “कायदा त्यांच्यावर जी कारवाई करेल ती होईल. आम्ही लोकसभा अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहिणार आहोत’. त्यामुळे ठाकरे गट आता केवळ पक्षांतर्गत कारवाईवर न थांबता संसदीय आणि कायदेशीर लढाईही लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंडखोर खासदार अज्ञातस्थळी

ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांना अज्ञातस्थळी हलवले आहे. स्वतंत्र गट आणि गटाच्या विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हे खासदार कुणाच्याही संपर्कात येणार नाही, याची काळजी शिंदे यांनी घेतली आहे. दिवसभर हे खासदार अज्ञातस्थळी होते. बंडखोर खासदार गुरूवारी रात्री उशीरा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा शुक्रवारी वर्धानपनदिन आहे. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात कायदेशीर अडचण नसल्यास बंडखोर गटाच्या विलीनीकरणाची घोषणा होऊ शकते अन्यथा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते.

बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार

संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख

बैठकीला उपस्थित खासदार

संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे

बंडखोरांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

दरम्यान, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून या खासदारांना तत्काळ ‘वाय प्लस’ सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य गुप्तवार्ता आयुक्त सुरेश जैन यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश काढले आहे. वाय प्लस सुरक्षा दिलेल्या खासदारांमध्ये यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, मुंबई उत्तर-पूर्वचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून हाय-अलर्ट

शिवसेना ठाकरे गटातील फूट आणि दोन्ही शिवसेना पक्षांचे मेळावे या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. या दोन्ही मेळाव्यांमध्ये एकमेकांविरोधात शक्तिप्रदर्शन होण्याची दाट शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.अपर पोलीस आयुक्त (विशेष) प्रवीण मुंडे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.

संतप्त शिवसैनिकांची निदर्शने

हे सहा खासदार त्यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना स्थानिक परिस्थिती आणि संभाव्य धोक्याचा आढावा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

फुटीवर शिक्कामोर्तब; ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश धुडकावला
Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा

उद्धव ठाकरेंची साथ सोडत या खासदारांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी विशेषतः खासदारांच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी, प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि पुतळादहनाच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित खासदारांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांच्या सुरक्षेसाठी साधारणतः एक पोलीस शिपाई दिला जातो. मात्र वाय प्लस सुरक्षा दिल्याने या खासदारांच्या सुरक्षेत ११ जण असतील. त्यात कमीतकमी २ कमांडो आणि बाकी सशस्त्र पोलिसांचा समावेश असेल.

logo
marathi.freepressjournal.in