Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जल्लोष; फुलांनी सजला गड, हजारो शिवभक्तांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर उत्साहात सोहळा पार पडला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत गड फुलांच्या सजावटीने नटला होता. संभाजीराजे छत्रपती, युवराज कुमार शाहाजीराजे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जल्लोष; फुलांनी सजला गड, हजारो शिवभक्तांची उपस्थिती
Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जल्लोष; फुलांनी सजला गड, हजारो शिवभक्तांची उपस्थिती
Published on

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवारी रायगड किल्ल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेल्या रायगडावर हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.

इ.स. १६७४ मध्ये याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यंदाच्या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी राजे, युवराज कुमार शहाजी राजे, रोहित पवार, खासदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रायगडावर उत्साहाचे वातावरण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये रायगडावर जमलेली मोठी गर्दी, भगवे ध्वज आणि जयघोष करत शिवरायांना अभिवादन करणारे शिवभक्त दिसून येत आहेत. संपूर्ण गड परिसर फुलांच्या सजावटीने नटलाय.

मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहळ्यासाठी सुमारे १,२०० पोलिस कर्मचारी, १५० अधिकारी, एसआरपीएफची एक तुकडी, २५० होमगार्ड आणि तीन आरसीपी पथके तैनात करण्यात आली होती. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठीही विशेष नियोजन करण्यात आले होते.

शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक वारसा

इ.स. १६७४ मध्ये झालेला शिवराज्याभिषेक हा केवळ धार्मिक किंवा राजकीय विधी नव्हता, तर स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा होती. याच राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी ‘छत्रपती’ ही पदवी धारण केली आणि स्वराज्याच्या इतिहासाला नवे पर्व सुरू झाले. यामुळेच शिवराज्याभिषेक दिन हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस मानला जातो.

logo
marathi.freepressjournal.in