मुंबई : 'काही लोक दमदाटी करत आहेत. पण, तुम्ही घाबरू नका, माझ्या कार्यकर्त्यांना धक्का लावला. तर, मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेतून विरोधकांना दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत नणंद आणि भावजय निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार म्हणाले, काही जण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दमदाटी करत आहेत. तुम्ही घाबरू नका. त्यातमध्ये कुठली बँक असो, कुठली सोसायटी असो, कुठलाही सचिव असो, मी सांगतो की, कोणी घाबरू नका, मी आहे. कोणाच्या मनगटात किती जोर आहे, हे अजित पवारला चांगला माहिती आहे. एखाद्यांनी माझ्या कार्यकर्त्याला धक्का लावला जर तिथे काही तरी गडबड केली. तर, मी कोणाच्या बापाचे ऐकत नाही, असा इशारा अजित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, "गैरप्रचार केला जात आहे की, सगळ्या मुस्लिम समाजाला सीएएच्या निमित्ताने कुठे तरी बाहेर पाठवणार आहे, हे खोटे आहे. हिंदवी स्वराज्यांची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना घेऊन राज्य स्थापन केले आणि तोच आदर्श ठेवून आम्ही सर्वजण काम करत आहोत. त्यामुळे तसे अजिबात होणार नाही. शेवटी आपण सर्वजण गुण्यागोविंदाने राहतो. कधीही कोणत्याही जातीधर्माच्या लोकांना वेगळी वागणूक दिली नाही. आम्ही जातीचा, नात्याचा आणि गोत्याचा विचार केलेला नाही ", असे ते म्हणाले.