राज्यात सिकलसेल आजाराचे १२ हजारांहून अधिक रुग्ण; २१ जिल्ह्यातील रहिवाशांची होणार तपासणी

सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो.
राज्यात सिकलसेल आजाराचे १२ हजारांहून अधिक रुग्ण | प्रातिनिधिक छायाचित्र
राज्यात सिकलसेल आजाराचे १२ हजारांहून अधिक रुग्ण | प्रातिनिधिक छायाचित्र Photo : linkedin
Published on

मुंबई : सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. राज्यात २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या सहा वर्षांत १ कोटी ५ लाख ८६ हजार ७३३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत १२ हजार ४२० रुग्णांमध्ये सिकलसेल आजाराचे निदान झाले असून १ लाख २४ हजार २७५ रुग्ण सिकलसेल आजाराचे वाहक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सिकलसेल आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच रुग्णांचा शोध घेत उपचारासाठी १५ ते ३१ जानेवारी २०२६ या पंधरवड्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत २१ जिल्ह्यांतील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात १५ जानेवारी या कालावधीत सिकलसेल अभियानाची पूर्व तयारी करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत “सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये एकही रहिवासी तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सिकलसेलग्रस्त रुग्णांना अर्थसहाय्य व इतर लाभ

सिकलसेलग्रस्त रुग्णांना (एसएस पॅटर्न) संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २,५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळते. दहावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत २० मिनिटे अधिक अवधी दिला जातो. बस प्रवास सवलत दिली जाते.

आजाराच्या प्रतिबंधासाठी हे करा!

सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्यामुळे माता-पित्याकडून अपत्यांना हा आजार होतो. विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा, लाल (एसएस) आणि पिवळे (एएस) कार्ड असलेल्यांनी आपापसात विवाह टाळावा, सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा, सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी.

सिकलसेलची लक्षणे

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हाता-पायावर सूज येणे, भूक मंदावणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे. सिकलसेल आजारावर उपचार काय? फॉलिक ॲसिडच्या गोळ्या निदमित घेणे, सोडामिंटच्या गोळ्यांचे सेवन महत्त्वाचे असते, भरपूर पाणी पिणे, वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे, गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे, समतोल आहार घ्यावा, बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन करून हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.

असा होतो सिकलसेल आजार

सिकलसेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला ‘सिकलसेल क्रायसिस’ म्हणतात. यामुळे असह्य वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होतात. आजार अधिक गंभीर झाल्यास मृत्यू होऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in