सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण अखेर सापडला; स्वत:च रचला होता बेपत्ता होण्याचा प्लॅन

सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला गौतम गायकवाड हा तरुण अखेर जिवंत अवस्थेत सापडला आहे.
singhgad-fort-missing-person-found-debt-stress
Published on

सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला गौतम गायकवाड हा तरुण अखेर जिवंत अवस्थेत सापडला आहे. रविवारी (दि. २४) संध्याकाळी स्थानिक नागरिकांनी त्याला दरीतून बाहेर काढले असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेपत्ता होण्यामागचं कारण

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गौतम गायकवाड याच्यावर मोठं कर्ज होतं. या कर्जाच्या तणावातून त्याने मुद्दाम बेपत्ता होण्याचा बनाव रचला असल्याचं समोर आलं आहे.

घटना कशी घडली?

गौतम गायकवाड हा मूळचा फलटण (जि. सातारा) येथील असून सध्या हैदराबादमध्ये वास्तव्यास आहे. तो आपल्या मित्रांसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता. बुधवारी (दि. २०) संध्याकाळी तानाजी कड्याजवळ त्याने “मी लघुशंकेला जातो” असे सांगून दूर गेला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो परतला नाही.

शोध घेताना त्याच्या मित्रांना केवळ चप्पल आढळली. त्यामुळे तो दरीत कोसळल्याची शंका निर्माण झाली आणि पोलिसांना तातडीने कळवण्यात आलं. त्यानंतर हवेली पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर शोध घेत होते. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौतम पळून जात असल्याचेही आढळून आले होते.

अखेर असा सापडला गौतम

२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता स्थानिकांना दरीत हालचाल दिसली. तातडीने शोध घेतल्यावर गौतम जिवंत अवस्थेत सापडला. स्थानिकांनी त्याला गडावरील वाहनतळाकडे आणलं आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गौतमने नेमका कोणत्या कारणासाठी असा बनाव रचला, त्याच्या कर्जाचे स्वरूप काय आहे, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in