

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने अखेर पोलिसांच्या पॉलिग्राफ (लाय-डिटेक्टर) चाचणीसाठी लेखी संमती दिली आहे. या चाचणीमुळे १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर नेमके काय घडले आणि केतन अगरवाल यांना सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलण्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा उलगडा होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
आरोपीच्या संमतीशिवाय पॉलिग्राफ चाचणी घेता येत नसल्याने तपास यंत्रणेसमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र, सिया गोयलच्या संमतीनंतर या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान 'क्रॉस मॅरेज'चाही मुद्दा समोर आला आहे. केतन अगरवाल यांचा साखरपुडा सिया गोयल हिच्याशी झाला होता, तर केतन यांच्या बहिणीचे लग्न सियाचा भाऊ साहिल याच्याशी होणार होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सियाचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असून, त्याच्याशी विवाह करण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या आरोपांची अंतिम पुष्टी न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.
सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलीस कोठडीत असून, सियाच्या मोबाईलमधील माहिती आणि आगामी पॉलिग्राफ चाचणीचे निष्कर्ष तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पॉलिग्राफ चाचणीमध्ये हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि श्वासोच्छ्वासातील बदलांच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या उत्तरांचे विश्लेषण केले जाते. मात्र, या चाचणीचा निकाल हा स्वतंत्रपणे गुन्हा सिद्ध करणारा पुरावा नसून तपासाला दिशा देणारे साधन मानले जाते.
सियाचा जुना व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणात आणखी एक नवा मुद्दा समोर आला असून सिया गोयलचा एक जुना व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डिसेंबर २०२५ मधील एका पबमधील असल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये सिया हातात बिअरची बाटली घेऊन मोबाईलवर कोणाशी तरी संतप्तपणे बोलताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती, आधी तू मला फसवतोस आणि मग मलाच फोन करतोस, असे म्हणताना ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओची सत्यता आणि त्याचा गुन्ह्याशी संबंध याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, या व्हिडीओमुळे तपासात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.