सोलापुरात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर प्रवासातच काळाने घाला घातला. हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ शनिवारी (दि. २२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात ३ तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. नळदुर्गजवळील खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी निघालेली क्रुझर जीप अचानक नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगाव आणि हडपसर (पुणे) येथील भाविक देवदर्शनासाठी क्रुझर जीपने (एमएच २४ व्ही ४९४८) निघाले होते. चिवरी फाटा परिसरात एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने जीपचे पुढील टायर फुटले. टायर फुटताच वाहनाचे नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला पलटी झाली. धडक इतकी भीषण होती, की अनेक प्रवासी वाहनाबाहेर फेकले गेले.
३ तरुणींचा जागीच मृत्यू
या अपघातात पूजा हरी शिंदे (वय ३०, ऊळेगाव), सोनाली माऊली कदम (वय २२, हडपसर) आणि साक्षी बडे (वय १९, हडपसर) यांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले असून त्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. जखमींमध्ये कुणाल भिसे (वय ३२), अंजली अमराळे (वय १५), आकाश कदम (वय २५), ओमकार शिंदे (वय १०), रुद्र शिंदे (वय १२), बालाजी शिंदे (वय ४७), माऊली कदम (वय ३०), हरी शिंदे (वय ३६), कार्तिक आमराळे (वय १३), कार्तिकी आमराळे (वय १५), शिवांश कदम (वय १ वर्ष), श्लोक शिंदे (वय ८) यांचा समावेश आहे.
घटना घडल्यानंतर समाजसेवक राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना सोलापूर सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. काही जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पाठीमागून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. टायर फुटण्यामागे मागील गाडीची धडक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपास दक्षिण सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.