
सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका युवक आणि युवतीने एकाच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, त्यामुळे आमच्यावर कोणतीही शंका घेऊ नका’ असा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रोहित ठणकेदार (वय 21, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) असून अश्विनी विरेश केशापुरे (वय 23, रा. शाहीर वस्ती, सोलापूर) असे तरुणीचे नाव आहे. रोहित ठणकेदार हा सोलापुरात ट्रकचालक म्हणून काम करत होता. तो अविवाहित होता. तर, अश्विनी केसापुरे ही सोलापूरात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील डी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती सुट्टीसाठी सोलापुरात आपल्या घरी आली होती.
मयत अश्विनीने रोहितची ओळख आपल्या कुटुंबीयांना "मानलेला भाऊ" म्हणून करून दिली होती. अश्विनीच्या नातेवाईकांनी सांगितले की, मागील काही वेळा रोहित तिला भेटण्यासाठी घरी आला होता. विचारणा केल्यास दोघांनी एकमेकांना 'मानलेले बहीण-भाऊ' अशीच ओळख दिली होती. मात्र, रोहितच्या कुटुंबीयांना अश्विनीविषयी कोणतीही माहिती नसल्याचा त्यांचा दावा आहे. यामुळे दोघांमधील नातेसंबंधांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गुरुवारी सकाळी अश्विनी शाहीर वस्तीतील राहत्या घरातून बागलकोटला कॉलेजसाठी निघाली होती. मात्र, संध्याकाळी एमआयडीसी पोलिसांनी तिच्या घरच्यांना तिच्या मृत्यूची माहिती दिली. कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यात एकाच स्कार्फला या दोघांनी गळफास घेतला. या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच दोघांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले.
पोलिस तपास सुरू -
घटनेची नोंद घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मोबाईल फोन, सुसाईड नोट आणि त्यांच्या व्यक्तिगत संबंधांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.