

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.