चाकरमान्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी ST ची ३०% भाडेवाढ अखेर रद्द

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यंदा एकेरी गट आरक्षणावर लागू केलेली ३० टक्के तात्पुरती भाडेवाढ रद्द केली आहे.
चाकरमान्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी ST ची ३०% भाडेवाढ अखेर रद्द
Published on

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यंदा एकेरी गट आरक्षणावर लागू केलेली ३० टक्के तात्पुरती भाडेवाढ रद्द केली आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाडेवाढीचे कारण काय होते?

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई आणि उपनगरांमधून कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. यंदा ५,००० विशेष एसटी बसेस कोकणासाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, बहुतेक प्रवासी फक्त एकेरी म्हणजेच कोकणच्या दिशेनेच आरक्षण करतात. परिणामी परतीच्या प्रवासात अनेक बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात, ज्यामुळे इंधन, कर्मचारी वेतन आणि अन्य व्यवस्थापन खर्चाचा मोठा भार एसटीवर पडतो.

या खर्चाचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने यंदा एकेरी गट आरक्षणावर ३०% भाडेवाढ लागू केली होती. मात्र, याला मुंबईतील चाकरमान्यांकडून विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत, भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

तोट्याचा अंदाज

मागील वर्षी गणपतीत ४,३३० बसेस कोकणात पाठवण्यात आल्या होत्या, तर फक्त १,१०४ बसेस परतीसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटीला जवळपास ११.६८ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला होता. यंदा ५,००० बसेस पाठवण्याचे नियोजन असल्याने तोटा १३ ते १६ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

सर्वसामान्य प्रवाशांचा विचार

''महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला फायदा -तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासा बरोबरच सण, यात्रा ,उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव,आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षण साठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो! त्यामुळे तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या सुचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता, यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे,'' अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in