मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपुरात भाजपला फक्त दोन जागा राखण्यात यश आले आहे. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पक्ष नेतृत्वावरच पुन्हा एकदा टीका केली. भाजपच्या नेत्यांनीच काँग्रेसला ताकद दिली आणि माझी ताकद कमी केली. मुख्यमंत्रीपद हे कायमचे नसते, ते येते आणि जात असते...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपुरात भाजपला फक्त दोन जागा राखण्यात यश आले आहे. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पक्ष नेतृत्वावरच पुन्हा एकदा टीका केली. भाजपच्या नेत्यांनीच काँग्रेसला ताकद दिली आणि माझी ताकद कमी केली. मुख्यमंत्रीपद हे कायमचे नसते, ते येते आणि जात असते. मुख्यमंत्रीपदही ज्यांचे आहे, त्यांचे येणार आहे, जाणारही आहे. पर्मनंट कोणी नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार, खासदार नाही किंवा मुख्यमंत्री नाही, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. चंद्रपुरात ११ पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. विदर्भातील १०० नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल ५५ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात २७ पैकी २२ नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले. मात्र, चंद्रपूरात भाजपला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवता आला आहे. भाजपच्या पदरी दोनच जागा मिळाल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. “मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात भगवान महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. पण योग्यवेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आहे. कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी निश्चित माझी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे वठवतो. पक्षाने मला जेव्हा-जेव्हा शक्ती दिली, तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढावी यासाठी काम केले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज कशाला होईन. चांगले काम करायचे हे आमचे कामच आहे,” असे सांगत मुनगंटीवार यांनी भाजपच्या नेत्यांबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा

संबंध नाही - बावनकुळे

मंत्रि‍पदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो. आम्हाला थोडे बळ, पाठबळ दिले पाहिजे ही भावना मुनगंटीवारांची आहे ते बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस कायम सुधीर मुनगंटीवारांना पाठबळ देत असतात, असे भाजपचे मंत्री चंद्रशे‌खर बावनकुळे यांनी सांगितले. यावर, “बावनकुळे साहेबांना आता असे वाटणे साहजिक आहे, पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा मात्र त्यांनाही असेच वाटत होते,” अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

मला ताकदीची गरज नाही - मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांना ताकद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यावर पलटवार करताना मुनगंटीवार म्हणाले की, “मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी कामे करतो, अनेक कामे मी केलेली आहेत.”

logo
marathi.freepressjournal.in