

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी दोन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती काहीशी बदलल्याने आता सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी केला.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्याने प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, तर बीड जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत, जिल्हास्तरावरील विकासकामांना गती देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
सुनेत्रा पवार यांना दिल्लीचे निमंत्रण
प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पुढील वाटचालीबद्दल चर्चा केली. तसेच अजित पवार यांचे विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या, असे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पटेल यांना दिले आहे. मात्र, सुनेत्रा पवार मोदी-शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला कधी जाणार, याची माहिती समोर आली नाही.