

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. पुण्यात मंगळवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडील सर्व खाती आणि पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच सोपवली आहेत. आता पक्षीय पातळीवरही त्यांना जबाबदारी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुणे मनपातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक गटनेते निलेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निकम यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला माजी महापौर वैशाली बनकर यांनी अनुमोदन दिले. ठरावात असे नमूद करण्यात आले आहे की, सुनेत्रा पवार यांनी नेहमीच पडद्यामागून पक्षासाठी मोठे योगदान दिले असून त्यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक आहे. कठीण काळात पक्षाला स्थैर्य देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने त्यांची निवड पक्षहिताची ठरेल.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे २७ नगरसेवक असून, या सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे अधिकृतरीत्या पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी यावर अंतिम मोहोर उमटवेल. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, ज्येष्ठ नेत्यांनी यावर आपली मते मांडली आहेत. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यास शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कायम राखण्यास मदत होईल, अशी भावना गटनेते निलेश निकम यांनी व्यक्त केली.
२३ नगरसेवकांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत २३ नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शविला. न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन सदस्य अनुपस्थित होते, मात्र उर्वरित सर्व नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. हा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात येईल.