सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढणार; पार्थ पवार राज्यसभेवर जाणार!

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढणार; पार्थ पवार राज्यसभेवर जाणार!
सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढणार; पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! Photo : PTI
Published on

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. मुंबईत प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याच बैठकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे समजते. मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) पाठवून पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे निश्चित केले आहे.

निवडणूक आयोगाने बारामती मतदारसंघासाठी आपली प्रशासकीय प्रक्रिया आधीच वेगवान केली आहे. आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, १ जानेवारी २०२६ पर्यंत ज्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे, त्यांना या पोटनिवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १० मार्च रोजी अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा होऊ शकते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in