राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पक्षाच्या अधिवेशनात एकमताने झाली निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारी पाठोपाठ आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पक्षाच्या अधिवेशनात एकमताने झाली निवड
(Photo-X/@SunetraA_Pawar)
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारी पाठोपाठ आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपविण्यात आली आहे. वरळी डोम येथे गुरुवारी झालेल्या पक्षाच्या विशेष राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. भावपूर्ण वातावरणात पक्षाची धुरा खांद्यावर घेताना सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले होते. ‘अजितदादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिले आहे. त्यांचे स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करू’, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षाचे विशेष राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार सुनील तटकरे हे काम पाहतील.

अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा

सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘अजित पवारांमुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती. अजितदादा आपल्यातून निघून गेले. अजूनही आपण त्या दुःखातून सावरलेलो नाही. पुढे काय करायचे, असा प्रश्न आपल्या सर्वांसमोर होता. पण सुनेत्राताईंनी जबाबदारी स्वीकारली. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष काम करेल’, असे पटेल यांनी जाहीर केले. आपल्या पक्षाशी ज्यांचा काहीही संबंध नाही असे काही लोक आम्ही काय करावे हे सांगत आहेत. त्यांच्या ओठात एक आणि पोटात वेगळे आहे, अशी टीकाही त्यांनी शरद पवार गटावर नाव न घेता केली.

समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही!

‘आपण योग्यवेळी योग्य निर्णय केला. आता, आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचे आहे. अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केले होते. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला होता. पक्ष, महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ, मुश्रीफ आमची सर्वांची जबाबदारी होती. आपला पक्ष आपण पुढे घेऊन जाणार आहोत, असे सांगत पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रथमच बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. ‘अजितदादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिले. त्यांचे विकासाचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्व जण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही’,अशी ग्वाही त्यांनी दिली.

दादांनी शेतीसाठी ‘एआय’ टेक्नॉलॉजी आणली...

‘लाडकी बहीण’ योजना सरकारने आणली आहे, पण इथेच आपली जबाबदारी संपत नाही. शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, दादांनी शेतीसाठी ‘एआय’ टेक्नॉलॉजी आणली होती. त्यावरही आपल्याला काम करायचे आहे. आता, सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही. मात्र, त्याने दिलेला विचार आणि शिकवण पुढे घेऊन जायची आहे. दादा अचानक गेले आणि मोठमोठ्या सगळ्या जबाबदारीचे ओझे ठेवून गेले. सगळ्यांच्याच अपेक्षांचे ओझे आणि त्याची जाणीव मला आहे’,असेही पवार म्हणाल्या.

पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ अजित पवार हे आमचे उमेदवार असतील. विजयासाठी ३७ मतांची गरज आहे, पण आमच्याकडे ४० मते आहेत. आम्ही चाळीसच्या चाळीस आमदार एकमताने, एक दिलाने पार्थ पवार यांना निवडून देऊ, अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केली.

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार!

आजचा प्रसंग माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलेलो नाही. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघण्यासारखी नाही. आपल्याला अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे’, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in