

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० दिवसांपूर्वी घेतलेली नवी कोरी थार घेऊन पिकनिकला गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. थार ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने ६ तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील कोंडवे कोपरे गावातील रहिवासी होते.
मोबाईल लोकेशनमुळे समजली घटना
या अपघातात प्रथम चव्हाण (वय २३), ओमकार कोळी (वय २०), श्री कोळी (वय १९), पुनीत शेट्टी (वय २१), शिवा माने (वय २०), साहील गोठे (वय २४) या तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण सोमवारी संध्याकाळी पुण्याहून थारमधून पिकनिकसाठी ताम्हिणी घाटाकडे निघाले होते. मंगळवार सकाळपासून कुटुंबियांसोबत त्यांचा काहीच संपर्क होत नव्हता. यामुळे नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. मोबाईल लोकेशननुसार त्यांची गाडी ताम्हिणी घाटातच असल्याचे समजले. माणगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली.
तुटलेली सेफ्टी रेलिंग आणि ड्रोनमध्ये दिसली थार
शोधादरम्यान रस्त्याच्या वळणावर तुटलेली सुरक्षितता रेलिंग आढळली. संशय बळावल्यावर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने दरीत पाहणी करण्यात आली आणि एका झाडात अडकलेली थार एसयूव्ही दिसून आली. गाडीची अवस्था भीषण असल्याचे दिसताच बचाव पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आले. सह्याद्री वन्यजीव रक्षण सामाजिक संस्था आणि स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने चार मृतदेह प्रथम बाहेर काढण्यात आले. त्यानंतरच्या तपासणीत उर्वरित दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजले. दरी खोल असल्याने मोठ्या मुश्किलने या तरुणांचे मृतदेह वर आणले.
प्रत्यक्षदर्शी नसल्याने अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सर्व मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातील. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. निसर्गरम्य ताम्हिणी घाटात फिरायला निघालेल्या या तरुणांसाठी पिकनिक शेवटची ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.