तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. घैसास यांच्याविरोधात अखेर गुन्हा, ससूनच्या दुसऱ्या अहवालात दोषी

उपचारांमध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अन्वये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. घैसास यांच्याविरोधात अखेर गुन्हा, ससूनच्या दुसऱ्या अहवालात दोषी
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी उपचारांमध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अन्वये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रियांका पठारे यांनी डॉ. घैसास यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. जुळ्या बाळांना जन्म देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला. या प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले. मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाच्या कुटुंबीयांकडे १० लाखांची मागणी केली. पैसे नसतील तर उपचार होणार नाहीत, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. त्यामुळे तनिषा यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा दावा भिसे कुटुंबाने केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाने केली आहे.

ससूनचा दुसरा अहवाल समोर आला असून अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात कलम १०६(१) नुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल शुक्रवारी समोर आला होता. त्यातून तनिषा भिसे यांचे कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवला होता. पण ससूनच्या दुसऱ्या अहवालात घैसास यांना दोषी धरण्यात आले आहे.

तनिषा भिसे प्रकरणात माता मृत्यू समिती, आरोग्य विभाग, धर्मादायक आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. आता चौथा अहवाल ससून रुग्णालय पुणे पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठवला आहे. त्यामुळे तनिषावर उपचार करत असताना दीनानाथ रुग्णालयात हलगर्जीपणा झाला का? या प्रकरणात ते दोषी आहेत की अन्य रुग्णालयात देखील उपचार करण्यात काही चूक झाली? या सगळ्याची उत्तरे या अहवालातून पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

घैसास यांच्यावर वेळकाढूपणाचा आरोप

ससूनला अहवाल परत मागवला होता. त्या अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेचार तास रुग्ण महिला घैसास यांच्या ओपीडीत होती, तरी उपचार सुरू न करता वेळकाढूपणा केला. यामध्ये संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला, असेही अहवालात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in