नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर संतप्त झाले आहे. नाशिककरांच्या लढ्यात अभिनेते, पर्यावरणप्रेमी आणि आता राजकीय नेत्यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील वृक्षतोडीवर आवाज उठवला आहे. "तपोवनमध्येच साधुग्राम का?" असा सवाल विचारत "आम्हाला भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नको!" असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
आज (दि.०६) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून वृक्षतोडीचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'एकाही झाडाच्या फांदीला मनसे हात लावू देणार नाही' असा इशारा दिला. तर आता आदित्य ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत.
जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती...
X च्या माध्यमातून आदित्य ठाकरे म्हणाले, "तपोवन... आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे."
नाशिकवर खरंच प्रेम आहे का?
पुढे ते म्हणाले, "तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये... म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल! तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आहे? नाशिकवर खरंच प्रेम आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ...
ते म्हणाले, "त्यांच्या सोशल मिडियावर तो होता! आणि त्याच्या बाजूला बसले होते ते नाशिक भाजपचे खजिनदार! हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना? नाशिक महानगरपालिका जर ह्यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे!
भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी
"७०० झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे! साधुग्राम आम्हाला हवा आहे. तपोवन आम्हाला हवा आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही!" असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावले.
'विकास' आणि 'पायाभूत सुविधा' या नावाखाली आक्रमण सुरू
आदित्य ठाकरे म्हणाले, "अरवलीच्या राजस्थान, गुजरात आणि हरियाणा पर्वतरांगांपासून ते मुंबई–ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत… नाशिकच्या तपोवनापासून नागपूरच्या अजनी वनापर्यंत… मेळघाट, सह्याद्री घाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापर्यंत अशा असंख्य हिरव्या पट्ट्यांवर… 'विकास' आणि 'पायाभूत सुविधा' या नावाखाली आक्रमण सुरू आहे. प्रत्यक्षात, आपल्या नैसर्गिक संपत्तीचा, जंगलांचा, हिरव्या पट्ट्यांचा ठेकेदार, खाणमालक आणि बिल्डर लॉबीच्या हाती सुपूर्द करण्याचा हा प्रयत्न आहे."
हे सरकार केवळ बिल्डर–कॉन्ट्रॅक्टर लॉबीसाठी काम करते का?
"दशकानुदशके ही जंगलं आणि हिरव्या जमीनं संरक्षित का ठेवली गेली होती, याला एक ठोस कारण आहे. दुर्दैवाने, विषारी हवा श्वासात घेतल्यानंतरही, मरत चाललेल्या नद्या पाहूनही, काँक्रीटने गुदमरलेल्या मोकळ्या जागा अनुभवल्यानंतरही जर आपल्या सरकारला ही जाणीव होत नसेल, तर मग प्रश्न पडतो…सरकार नेमकं कुणासाठी आहे? हे सरकार केवळ बिल्डर–कॉन्ट्रॅक्टर लॉबीसाठी काम करते का? की या भूमीत राहणाऱ्या समुदायांसाठी आणि सामान्य जनतेसाठीही?" असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तपोवनच्या वृक्षतोडीचा प्रश्न चिघळत चालला असून आता शासनाकडून यावर नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.