उल्हासनगर : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी सक्तीचे केले असले, तरी ही प्रक्रिया महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरत आहे. दोन महिन्यांची मुदत देऊन शासन निर्णय जारी करण्यात आला असला, तरी लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना खूपच मनस्ताप होत आहे. शहरी भागातही ही समस्या गंभीर असून ग्रामीण भागात परिस्थिती आणखीनच बिकट आहे. वाचन-लेखन न येणाऱ्या महिलांना इतरांकडून ई-केवायसी करून घ्यावे लागत आहे; मात्र त्यातही अडथळे येत आहेत.
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत जाहीर करून शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानंतर महिलांकडून ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरळीत पार न पडता महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गावागावांत अनेक महिलांना वाचन-लेखन येत नसल्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या मदतीने ई-केवायसी करावी लागते. मात्र, मदत करणाऱ्यांनाही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबते. या समस्येमुळे योजना लाभार्थीमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शासन व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्याची मागणी होत आहे.
लाडक्या बहिणींसाठी सुरू असलेली योजना महिलांना दिलासा देणारी ठरावी अशी अपेक्षा आहे, परंतु ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थीना उलट गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शासनाने त्वरित तांत्रिक सुधारणा करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर
उल्हासनगर शहरातील महिलांचे म्हणणे आहे की, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर दिसत आहे. कधी लिंकच ओपन होत नाही, तर कधी मोबाईलवर ओटीपीच येत नाही. यामुळे ऑनलाइन प्रक्रिया अधांतरीच राहते. शहरी भागात जिथे मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा सहज उपलब्ध आहे, तिथेच महिलांना या अडचणी येत आहेत, तर ग्रामीण भागातील परिस्थिती आणखीनच कठीण आहे.