

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. यातही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, युतीची घोषणा कधी होणार, असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून विचारले जात होते. आज (दि.२३) यावर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे.
काय आहे राऊत यांचं ट्विट?
संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर "उद्या १२ वाजता" अशी कॅप्शन देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राज आणि उद्धव दोघांच्या हातात पुष्पगुच्छ दिसत आहे. त्यावरून उद्या, बुधवारी (२४ डिसेंबर) दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक अशा महानगरपालिकांसाठीही ठाकरे बंधू एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, त्यापूर्वी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे. युतीबाबत आता कोणताही संभ्रम उरलेला नाही. तसे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले आहे.”
घोषणेची घाई कशाला?
पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत घोषणा कधी होणार, या प्रश्नावर संजय राऊत यांनी माध्यमांना टोला लगावत म्हटले, “ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले, त्या दिवशीच युती झाली आहे. घोषणेची घाई कशाला? आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही घोषणा करू. तुम्ही सांगाल त्या तारखेला करणार नाही.”
जागावाटपाबाबत स्पष्ट भूमिका
जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “आमचं जागावाटप आणि तिकीटवाटप पूर्ण झालं आहे. निष्ठावंतांना डावलून गद्दारांना तिकीट देण्याइतकी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही.”
महानगरपालिकांमध्ये चर्चा पूर्ण
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की अनेक शहरांतील जागावाटपाच्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत. “नाशिकमध्ये चर्चा झाली आहे, पुण्याचा विषय संपवला आहे. कल्याण-डोंबिवलीचा निर्णय झाला आहे. ठाणे आणि मीरा-भाईंदरबाबतही चर्चा झाली आहे. इतक्या महानगरपालिका असल्याने थोडा वेळ लागत आहे, पण आम्ही एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. त्यातच, उद्या १२ वाजता नेमकं काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.