

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून स्वतंत्र गटाच्या मंजुरीसाठी लोकसभाध्यक्षांना पत्र देणाऱ्या आणि पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या सहा खासदारांना ठाकरे गटाने नोटीस बजावली आहे. या नोटीसला २४ तासांत उत्तर द्या. समाधानकारक उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा फुटीर खासदारांना देण्यात आला आहे. पक्षादेश (व्हीप) बजावूनही पक्षाच्या अधिकृत बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या ६ खासदारांवर ठाकरे गटाने कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी या सर्व खासदारांना अधिकृत 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बंडखोर खासदारांना बैठकीला गैरहजर राहण्यामागचे कारण स्पष्ट करण्यासाठी अवघ्या २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत समाधानकारक लेखी उत्तर न आल्यास पक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोकळा असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
राजकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर खासदारांनी वेळेत उत्तर दिले नाही, तर त्यांनी 'स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे' असे कायदेशीर गृहीत धरले जाईल, असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
दहाव्या बंडखोर खासदारांनी पक्षादेश धुडकावल्यामुळे त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीतील' पक्षांतरबंदी कायद्या' अंतर्गत थेट अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना शिफारस करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्या सहिने ही नोटिस पाठविण्यात आली आहे.
ओमराजेंबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालावर बोलताना अनिल देसाई म्हणाले, ओमराजे निंबाळकर यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा संघर्ष होता. वडिलांच्या हत्येनंतर दोन दशके त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. काही गोष्टी घडतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र आजच्या निकालानंतर त्यांचा तो विश्वास तुटल्याचे दिसत आहे. निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागला नसल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे.
ओमराजे यांना पुन्हा घेणार का, या प्रश्नावर बोलताना, पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहून त्यांनी पक्षादेशाकडे दुर्लक्ष केले, पक्षशिस्तीचा भंग केला आहे. जर आता ते पुन्हा शिवसेना ठाकरे गटात येण्याचा विचार करत असतील तर त्याबाबतचा अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याचे देसाई यांनी सांगितले.