मुंबई : सूर्य आग ओकत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पारा ४४ अंश सेल्सिअस पार गेला असून उष्णतेच्या लाटेने उष्णता विकार बळावले आहेत. राज्यात उष्णतेच्या लाटेने नाशिक येथे २९, जालना- २८, बुलढाण्यात २३ रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च ते २६ मेपर्यंत २६७ जण बाधित झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढत चालले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर राज्यातील तापमानात वाढ होत गेली. मुंबईतही उन्हाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर गेल्याने मुंबईकर हैराण झाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाल्याने उष्णता विकाराचे आजार वाढले. राज्यातील तीन महिन्यांत २६७ रुग्ण उष्माघाताचे आढळले असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना वरुणराजाचे वेध लागले असून दोन दिवसांपासून तुरळक सरी बरसत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात हिट वेव्हचे सर्वाधिक रुग्ण
नाशिक- २९, जालना- २८, बुलढाणा- २३,
धुळे- २०, सोलापूर- १९, नांदेड- १५, परभणी- १२, पालघर- १०, उस्मानाबाद- १०
हे करा
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
उन्हात जाताना टोपी/ हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करू नका
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
कष्टाची कामे उन्हात करू नका.
पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका.
उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.
मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.