संघ शाखांची संख्या वर्षभरात ४,४६६ इतकी वाढली; संघाचे संयुक्त सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांची माहिती

संघ शाखांची संख्या वर्षभरात ४,४६६ इतकी वाढली; संघाचे संयुक्त सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांची माहिती

शुक्रवारी नागपुरात संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची ही तीन दिवसांची बैठक सुरू झाली. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये समावेश व्हावा यासाठी आता अधिकाधिक लोक येत असून ज्यांना अल्पसंख्याक म्हटले जाते असे लोकही संघाच्या शाखांच्या कामांमध्ये आधीपासूनच सहभागी आहेत, असे सांगत गेल्या वर्षभरात शाखांच्या संख्येत ४,४६६ इतकी वाढ झाल्याची माहितीही रा. स्व. संघाचे संयुक्त सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी नागपुरात संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची ही तीन दिवसांची बैठक सुरू झाली. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या विषयांमध्ये, नामांकनात बदल केल्याचे सांगून या वर्षापासूनच त्या सुधारणा लागू केल्या जातील, असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होईल का, असे विचारले असता वैद्य म्हणाले की, संघ नेहमीच जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करतो आणि संघ स्वयंसेवकही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतात.

वैद्य म्हणाले की, मोठ्या संख्येने लोकांना संघाचा भाग व्हायचे आहे आणि अशा व्यक्तींकडून संघात सामील होण्यासाठी संघटनेला वर्षाला सुमारे एक लाख विनंत्या येतात. देशभरात दररोज ७३११७ संघ शाखा आयोजित केल्या जातात आणि त्यापैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थी असतात. गेल्या वर्षभरात शाखांच्या संख्येत ४,४६६ ने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

१४० कोटी भारतीय समुदाय केवळ ‘हिंदू’

संघ अल्पसंख्याकांपर्यंत कसा पोहोचेल या प्रश्नावर वैद्य म्हणाले की, १४० कोटी भारतीय समुदाय केवळ ‘हिंदू’ असल्याचे संघाचे मत आहे व ते कायम आहे. कारण तुमचे पूर्वज हिंदू होते आणि आमची संस्कृती एक आहे. ज्यांना अल्पसंख्याक म्हटले जात आहे ते संघ शाखा आणि संघाच्या कार्यात सक्रिय आहेत आणि त्यांच्या मनात संघाबद्दलची जी भीती निर्माण झाली होती ती हळूहळू दूर होत आहे आणि त्यांचा संघकार्यात सहभाग वाढत आहे, असेही वैद्य म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in