औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक; संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांचे मत

मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, म्हणून त्याची कबर इथेच असणार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी  यांचे संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, म्हणून त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचा आदर्श आहेत. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचे, सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी भाजपला फटकारले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात भाजपच्या नेत्यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यावर अनेक वक्तव्ये केली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनीही आता हा विषय चर्चिला जाण्याची गरज नाही, असे वक्तव्य करत भाजपचे कान टोचले होते. आता ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनीही याप्रकरणी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, “इतिहासाकडे जात आणि धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खान याला प्रतापगड किल्ल्याजवळ दफन करण्यात आले होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय करता आले नसते. त्यामुळे आता औरंगजेबाची कबर आहे तशीच राहील, ज्याला जायचे आहे तो जाईल.”

संघ-मोदी यांच्यात दुरावा नाही

नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) असलेले नाते खोलवर रुजलेले आहे. भाजप आणि संघाचे सदस्य म्हणून मोदींची विचारसरणी आणि नेतृत्वशैली आरएसएसच्या तत्त्वांनी आकाराला आली आहे. संघ आणि मोदी यांच्यातील दुरावा वाढला असल्याच्या बातम्या फक्त प्रसार माध्यमांमध्येच आहेत. मोदींच्या कामावर आम्ही खूश आहोत, असे भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in