

नंदुरबार : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ येथे गुरुवारी झिपलाइनचा रोमांच अनुभवण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकासाठी हा प्रवास थरारक ठरला. सीताखाई पॉइंटवरील सुमारे ३,५०० फूट खोल दरीवर उभारलेल्या झिपलाइनमध्ये हा पर्यटक हवेतच अडकून पडला. काही काळ हवेत अडकल्यानंतर झिपलाइन ऑपरेटरनी तातडीने बचाव मोहीम राबवत मोठ्या प्रयत्नांनी त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तोरणमाळ येथील सीताखाई पॉइंटवर घडली. झिपलाइनवरून प्रवास सुरू असतानाच एक पर्यटक मध्यभागी अडकून पडला. याची माहिती मिळताच झिपलाइन ऑपरेटरनी तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनंतर पर्यटकाला सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
व्हिडीओमध्ये काय दिसते?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेल्मेट घातलेला पर्यटक झिपलाइनच्या मध्यभागी अनेक मीटर उंचीवर हवेत लटकलेला दिसतो. त्यानंतर एक बचाव कर्मचारी दोरीच्या साहाय्याने हळूहळू त्याच्यापर्यंत पोहोचतो. बऱ्याच प्रयत्नांनंतर तो पर्यटकाला सुरक्षितपणे आपल्या दोरीला जोडतो आणि झिपलाइनच्या शेवटच्या टोकाकडे घेऊन जात त्याची सुखरूप सुटका करतो. हा संपूर्ण थरार पाहून घटनास्थळी उपस्थित पर्यटकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली झिपलाइन
सीताखाई पॉइंटवरील झिपलाइन सुविधा यावर्षी फेब्रुवारीमध्येच पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. साहसी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही सुविधा अल्पावधीतच पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी तो शेअर केला आहे. या घटनेनंतर साहसी पर्यटन उपक्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. झिपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पर्यटक हवेत अडकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, यामागचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.