मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होणार असून भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात एक क्रांती घडणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक व हायब्रीड कारचे उत्पादन होणार आहे. यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, यातून सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ८५० एकर जागा देण्यात आली आहे.
दरम्यान, सह्याद्री अतिथिगृहात बुधवारी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असून सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी कायाद्यात आवश्यक ते बदल केले आहेत. राज्यात सर्वोत्तम दळणवळण, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध आहे. टोयोटाचे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि आमचे कुशल मनुष्यबळ याची चांगली सांगड होईल. राज्यात शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, गृहनिर्माण अशा सुविधा मुबलक उपलब्ध असून कोणत्याही उद्योगाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंदाने राहता येईल, असे वातावरण आहे. राज्य विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर असून गेल्या दोन वर्षात दाव्होस येथे झालेल्या ६० दशलक्ष डॉलर्सच्या करारांची ८० टक्के अंमलबजावणी झाल्याचे ते म्हणाले.
जपानी भाषेत भाषणाची सुरुवात
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात जपानी भाषेत नमस्कार म्हणजे “कोनीचिवा” असे संबोधून केली, तर आभार देखील “एरिगेटो गोझामासू” अशा शब्दात मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. हा करार अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात ‘जेएनपीटी’सारखे बंदर आहे आणि त्याच्या तीनपट मोठे वाढवण बंदर होणार आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. तसेच जालनामध्ये ड्राय पोर्ट होणार आहे.
निर्यातीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी मसाकाझु योशीमुरा यांनी देखील आपल्या मनोगतात महाराष्ट्राची निवड या प्रकल्पासाठी करण्यामागची कारणे सांगितली. भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र विकासात टोयोटा एक भागीदार बनू इच्छिते. भारताशी गेल्या अडीच दशकापासून आमचे संबंध असून ते या प्रकल्पामुळे अजून वाढीस लागतील, असेही ते म्हणाले. मानसी टाटा यांनी राज्य शासनाचे या प्रकल्पाला सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले. प्रारंभी प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी या प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टोयोटा - किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदी उपस्थित होते.
मराठवाड्याची आर्थिक प्रगती - फडणवीस
राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत. आता राज्यात टोयोटा असल्याने हे सेक्टर पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील ‘चेंबर ऑफ कॉमर्स समूह’ या उद्योगासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करेल. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात रोजगारनिर्मिती तर होणारच आहे, पण आर्थिक प्रगतीही साध्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.