

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. "रांगेत उभे राहण्याची गरज नाही, थेट दर्शन घडवून देतो," असे सांगत काही दलाल आणि एजंट भाविकांकडून हजारो रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्हीआयपी दर्शनासाठी हजारोंची मागणी
त्र्यंबकेश्वरमध्ये दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. गर्दीचा फायदा घेत काही जण भाविकांना गाठून त्वरित दर्शनाचे आमिष दाखवतात. अधिकृतरित्या व्हीआयपी दर्शनासाठी केवळ २०० रुपयांची फी असताना, दलालांकडून प्रत्येकी ३,००० ते ४,००० रुपये मागितले जात असल्याची तक्रार आहे. 'वेळ वाचेल' या उद्देश्याने अनेक भाविक पैसे देतात, मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याला 'श्रद्धेची लूट' असे म्हटले जात आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर प्रकरण तापले
या संपूर्ण प्रकाराची पोलखोल एका महिला भाविकाने केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असून, मंदिर परिसरात दलालांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाविकांना थेट गाभाऱ्यापर्यंत नेले जात असल्याच्या आरोपांमुळे व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत.
सुरक्षा आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
याआधी मंदिरातील सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्या घटनेची चौकशी सुरू असतानाच आता आर्थिक शोषणाच्या आरोपांमुळे मंदिर प्रशासन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरक्षा आणि व्यवस्थापन या दोन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाकडून काय कारवाई होणार?
देवदर्शनाच्या नावाखाली होणारी ही वसुली थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक पोलिस याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेळेत हस्तक्षेप झाला नाही, तर या पवित्र स्थळाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.