मुख्यमंत्री शिंदे संघाच्या कार्यालयात; उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिंदेंची नजर वाईट'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली तसेच डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले
मुख्यमंत्री शिंदे संघाच्या कार्यालयात; उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिंदेंची नजर वाईट'
@Dev_Fadnavis

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील रेशीमबाग राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयाला भेट देत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. भाजपवगळता कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री संघाच्या नागपूर कार्यालयाला भेट देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. यावरून आता विरोधकांनी खासकरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

नुकतेच मुंबई पालिकेतील कार्यालयावर ताबा मिळवण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा पाह्यला मिळाला. यासर्व गोष्टींवरून उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रेशीमबागेतील संघाच्या कार्यालयावर ताबा सांगण्यासाठी गेले होते का?" असा टोला लगावला. ते पुढे म्हणाले, "संघ कार्यालयामध्ये एकनाथ शिंदेंनी काही लिंबू वगैरे तर ठेवले नाहीत ना? याची तपासणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून घ्यावी. एकनाथ शिंदेंची नजर अतिशय वाईट आहे."

पुढे त्यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली. तसेच, "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर मंत्र्यांनी महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्ये करूनही त्यांच्यावर सरकारने काहीच कारवाई केली नाही. असे निर्लज्ज लोक अजूनही पदावर कसे आहेत?" असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. पुढे ते म्हणाले की,"ज्या विदर्भासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन भरवले जाते, त्या विदर्भाला या अधिवेशनाने काहीच दिले नाही. अधिवेशनामध्ये अतिवृष्टी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चासुद्धा झाली नाही." अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in