
वरळीतील ऐतिहासिक मराठी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर या दोघांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि ठामपणे सांगितलं, हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही आणि जर मराठीसाठी आवाज उठवणं गुंडगिरी असेल तर होय, आम्ही गुंड आहोत! या भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या, मराठी भाषेवरील हक्क, दिल्ली दरबारी नतमस्तक झालेल्या नेत्यांची लाचारी आणि महाराष्ट्रात मराठीची गळचेपी यावर परखड भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून आपण आजही त्याच विचारांसोबत उभं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, की ''बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. साहजिकच आहे त्याचंही कर्तृत्व आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी, हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.'' असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
पुढे ते म्हणाले, की ''अप्रतिम मांडणी राजने केलेली आहे. माझ्या भाषणाची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांच लक्ष भाषणांकडे आहे. पण, वैयक्तिक मला वाटतं, की आमच्या भाषणांपेक्षा एकत्रित दिसणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत. ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली. सगळ्यांना धन्यवाद देतो. दीपक पवार पण त्यांच्यात आहेत. मुणगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहे. सगळेच आहेत. महादेवराव आपल्यात सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिलेत. त्यावेळी जानकर देखील अंजान होते. पण एक गोष्ट नक्की, जो आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता, तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी!
भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, की ''आज मला कल्पना आहे, की अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांच्या समोर आम्ही वारसदार म्हणून उभे ठाकलेलो आहोत.
मोदींची शाळा कोणती?
भाजपच्या शाळा या टीकेवर लक्ष करत उद्धव ठाकरे म्हणाले की ''भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा करून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी मी काय राजने काय अगदी सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात. अरे डोक्यावर जर शिवसेना प्रमुख नसते तर ओळखत कोण असतं या महाराष्ट्रांमध्ये? कोणत्या भाषेत बोलत होतात. राजने सगळ्यांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती?
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं -
हिंदुत्वाविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की ''मध्यंतरी मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. मराठी बोलणारे तुमच्यापेक्षाही जास्त कट्टर, कडवट देशाभिमानी हिंदू आहेत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे ९२/९३ साली जेव्हा जे काही घडलं, देशद्रोही मातले होते; तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी म्हणून वाचवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातमी आली आहे सगळीकडे, मी बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच.''
पण, हे सगळे राजकीय बाडगे -
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले,की ''पण, हे सगळे राजकीय बाडगे. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मला संयुक्त महाराष्ट्र वेळी सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवतंय. हे असेच तेव्हाचे म्हणजे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात. त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपण मिळवली. मराठी माणसाने! तेव्हाही तत्कालीन जे राज्यकर्ते होते, तेव्हाही कॉँग्रेस होतीच ना सत्तेवर. मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे जे आज बोलतायत ना आम्ही मराठी नाहीत का? अरे तुम्ही नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात रक्त आहे का? तपासावे लागेल. सखा पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत? झुकवलं, वाकवलं गुडघ्यावरती, आणलं मराठी माणसाने..आणि मुंबई आपल्या हक्काची आपण लढून ती मिळवून घेतली.''
''कशासाठी हा सगळा घोळ घालताय? माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे. पटतोय की नाही बघा. काश्मीरमध्ये ३७० कलम होतं ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हाही यांनी घोषणा दिली होती; 'एक निशाण, एक विधान, एक प्रधान'. बरोबर आहे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडक असता कामा नये. ते फडकं म्हणजे आपला राष्ट्रध्वज नाहीये. त्याच्या नंतर आता नवीन एक टुमणं काढलं; वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने सगळं काही एक एक करत हिंदी हिंदू हिंदुस्थान.. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिटया करा हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी लावू देत नाही.'' उद्धव ठाकरे यांनी असं परखड भाष्य केलं.
पुढे म्हणाले, की ''मग फेक नरेटीव्ह पसरायच. हे उद्धव ठाकरेंच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे काम करत होता मग पाडलंत कशाला गद्दारी करून? का नाही बोंबललात तेव्हा? पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्री मंडळातले सहकारी इथे बसलेत जितेंद्र आव्हाड आहेत..आणखी कोणी असतील, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे. काय केलंत त्याचं तुम्ही? महराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करावी लागते? का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन? पण, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोकं कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही होत? आता कोणतरी भेडीया आहे ही यांची सगळी पिलावळ आहे, तोडा, फोडा आणि राज्य करा!
मुंबईतून, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले -
भाजपवर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, की ''हे म्हणतात, की शिवसेनेने काय केलं? राज मी तुला पण सोबतच घेतो; कारण तेव्हा एकत्रच होतो, आता पुढे एकत्रच आलेलो आहोत. म्हणतोय एवढ्या वर्षांचा कालखंड.. मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला. जर का तुम्हाला असं वाटत असेल तर १४ वर्षांनंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत.. मुंबईतून, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र गेलं, हीरे व्यापार गेला, मोठमोठे ऑफिसेस गेली, आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले? तेवढेच सगळे हिंदुस्थान तेव्हढेच हिंदू आहेत? आम्ही सगळं करत होतो, केलं होतं पण तुम्ही प्रथम गद्दारी केली. तुम्ही आमचं पहिलं सरकार पाडलंत. कारण तुमचे जे दोन मालक तिथे बसलेले आहेत दोन व्यापारी, त्यांच जे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत करत आपण आलो.''
आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबिज करू -
''आपल्या डोळ्यादेखत सगळे लचके तोडले जात आहेत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्ट आपल्या डोक्यावर बसताहेत किती काळ सहन करायचं? प्रत्येक वेळी काही झालं की भाडाभांडी लावायची, आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा 'म' मराठीचा नाही, महापालिकेचा आहे..अरे नुसता महापालिकेचा नाही महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबिज करू. आज तर निवडणुका नाहीयेत. सत्तेबद्दल शिवसेना प्रमुखानी सांगितले आहे, सत्ता काय येते आणि जाते पण आपली ताकद आपल्या एकजुटीत असली पाहिजे. दरवेळा संकट आलं की आपण मराठी एकवटतो, संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो हा नतद्रष्टपणा आपल्याला करायचा नाही. अजिबात करायचा नाही.'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिल्लीचे गुलाम एकत्र राज्य करायला लागले -
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं 'बटेंगे तो कटेंगे'; आपल्याला काय वाटलं हिंदू मुस्लिम करत आहेत. त्यांनी ते तर केलं, पण त्यांनी खासकरून केलं ते मराठी आणि मराठीतेतर (अमराठी) केलं, गुजरातमध्येही केलं. मला वाटतं मोदी का त्याच्या आधी माहोल असेल माहीत नाही; वातावरण अस पेटलं होतं गुजरातमध्ये बस आता पटेल यांना आपटेल! त्यांनी काय केलं? पटेलांना भडकवलं, त्यांना वेगळं केलं आणि पटेलेतर (पटेल सोडून इतर) एकत्र केलं. हरियाणामध्ये पण तेच केलं. जाट लोकांना भडकवलं आणि जाटेतर (जाट सोडून इतर) समाज होता त्यांना एकत्र केलं. महाराष्ट्रात पण तेच केलं. मराठ्यांना उकसवलं आणि मराठीतेतर एकत्र केलं. 'बटेंगे तो कटेंगे' ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली. मराठी माणूस एकमेकांमध्ये भांडला आणि दिल्लीचे गुलाम एकत्र राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या? नुसते पालख्यांचे भोई होणार की कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात? बस्स झालं आता यांची झोकट फेकून दिली पाहिजे.''
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा -
''एकमेकांमध्ये भांडून त्यांचे डाव साध्य करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं काल आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहेत. काय तो पट्टा घालतायत. 'स्टार ऑफ घाणा' कुठे आला घाणा देश? इथे घाण तिथे घाणा.. पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झालाय.. त्याला बैल मिळत नाही.. त्या नांगराचं जोखड घेऊन शेती करतोय आणि तिकडे यांच्या गळ्यामध्ये 'स्टार ऑफ घाणा' लाज वाटली पाहिजे'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंना लक्ष्य -
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली नसली तरी उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून या दोघांनाही लक्ष्य करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की ''काल एक गद्दार 'जय गुजरात' बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, 'झुकेगा नही साला'. पण आपले गद्दार म्हणतात, 'कुछ बी बोलो, उठेगा नही साला'. अरे कसे उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं.. म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय..."हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर 'जय गुजरात' म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?''
मराठी प्रेमींना आवाहन -
''ब्राह्मण-ब्राह्मणेतर, ९६ कुळी, ९२ कुळी, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी, कोकणी हे सगळे मतभेद गाडून सगळ्या मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा. शेवटी एक आवाहन करतो सगळ्या मराठी बांधवांना, मराठी प्रेमींना.. तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका.'' अशाप्रकारे शेवटी मराठी बांधवांना आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा समारोप केला.