मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुंबईकरांमध्ये असलेली सहानुभूती आणि सध्या आक्रमक पद्धतीने चाललेल्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सहापैकी चार जागा लढविण्यासाठी आग्रही आहेत. ठाकरेंची शिवसेना ईशान्य मुंबईतून खा. संजय राऊत यांना निवडणूक मैदानात उतरवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात भाजप आघाडीवर आहे. यासोबतच मविआतही हालचाली वेगात सुरू आहेत. मुंबईत लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत. या सर्व जागा भाजप-शिवसेना युतीच्याच ताब्यात आहेत. परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अशा स्थितीतही शिवसेना ठाकरे गट मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर आग्रही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. परंतु काँग्रेस हा फॉर्म्युला मान्य करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून यावरून जागावाटपाच्या वेळी मविआत धुसफूस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मविआत जिंकून येण्याचा निकष ठरविण्याचे संकेत दिले आहेत, पण जागावाटपात मुंबईत ठाकरे गटाचे सूत्र मान्य होणार की, काँग्रेस सवतासुभा मांडणार, हे जागावाटपाच्या बैठकीतूनच स्पष्ट होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४-१-१ असेच मविआचे सूत्र ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यात दक्षिण मुंबईत पुन्हा अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तसेच उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना याच मतदारसंघातून मैदानात उतरविण्याचे संकेतही ठाकरे गटाने दिले आहेत. त्यामुळे येथे थेट पिता-पुत्रातच लढत पाहायला मिळू शकते. यासोबतच दक्षिण-मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघावरही ठाकरे गट दावा सांगण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर ईशान्य मुंबईतून विद्यमान राज्यसभा खासदार संजय राऊत यांनाही मैदानात उतरविले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात असून, मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत. येथेही ठाकरे गटच मैदानात उतरू शकतो.
उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई सोडण्यास तयार
दरम्यान, ठाकरे गटाने दक्षिण-मध्य मुंबईवर दावा सांगितला असला, तरी येथे काँग्रेसचाही चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेस दावा सांगू शकतो. ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु येथील खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला हवी आहे. ठाकरे गट ही जागा सहजासहजी सोडू शकणार नाही. या जागेवरूनही दावे-प्रतिदावे होऊ शकतात. ठाकरे गट उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला देण्यास तयार आहे. ठाकरे गटाने मुंबईतील सहा जागांचे ४-१-१ असे सूत्र ठरविल्याचे बोलले जात आहे. मविआच्या बैठकीत याच सूत्रानुसार ठाकरे गट बोलणी करण्याबाबत आग्रही राहील, असे सांगितले जात आहे. मात्र, मविआच्या बैठकीतच जागावाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. यातून मविआचे नेते कसा मार्ग काढतात, यावर जागावाटपाचे सूत्र अवलंबून आहे.