
मुंबई : शिवसेना आजही तरुण आहे आणि उद्याही तरुणच राहणार आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी धरून ‘ठाकरे’ ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशाण राज्यातून मिटवू, असा सज्जड इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला दिला. काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत काय होणार, पण राज्याच्या मनात जे आहे तेच होईल. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीच्या दिलजमाईचे संकेत दिले. हिंमत असेल तर अंगावर या, येताना सरळ याल, पण जाताना ॲॅम्ब्युलन्समधून आडवे होऊनच जाल, असा इशारा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असेही त्यांनी बजावले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन गुरुवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा’ अशा जोरदार घोषणांनी सभागृह दणाणले. ‘पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही, असा प्रश्न भाजपला सतावत आहे, असे ते म्हणाले.
“ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली. त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा भाजपने उभारला, हे यांचे हिंदुत्व. भाजपने पाळलेली बेडके आज डराव डराव करतील. ही पाळीव बेडके डोळ्यासमोर येतात. या चोरांनी खरंच लाज शरम ठेवली नाही. नॅपकिन का ठेवला? तेही कळत नाही. असा हा भाजप पक्ष,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली. यावेळी राणे कंपनीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
“दाढी फुटली तेव्हा ते कुठे होते माहित नाही. शिवसेनेने दिले आणि शिवसेनाच चोरली. तुम्हाला जाहीर आव्हान देतो, कमॉन किल मी, समोर येऊन वार करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वार करताना अॅम्ब्युलन्स घेऊन या. तुम्ही वार कराल, पण आडवे होऊन रुग्णवाहिकेतून जाल,” असे खुले आव्हानही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिले. “भाजपचे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्यांनाच बरोबर घेत पाय धुऊन पाणी पिताहेत. बाहेरची पोरं घेता, त्यांना तुमच्या डोक्यावर बसवता. भाजपमधील नेत्यांची कीव येते, किती वर्षे ते सतरंज्या उचलत राहणार. ५६ इंचाची छाती असेल तर बाहेर पडा आणि अन्यायाला वाचा फोडा,” असे आवाहन त्यांनी भाजपमधील त्रस्त नेत्यांना केले.
बातम्या सुरू आहेत. काय होणार. कसे होणार, का होणार की नाही, होणार, कळेल ना. जे कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार आहे, असे सूचक विधान करत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे संकेत दिले. ते म्हणाले की, “युती होऊ नये, मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे-तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? कसे होणार? त्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये, यासाठी शेठजीचे नोकर आणि जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते त्या शेठजींच्या नोकरांचे नोकर प्रयत्न करत आहेत,” असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी चढवला.
हिंदू, मुस्लिमांवर बोलणारा एकजण बसवला आहे. त्याची उंची पेंग्विनची, चाल बदकाची अन् बोलणं बेडकासारख डराव डराव करायचं, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंचे नाव न घेता जोरदार टीका केली.
तुमच्या छाताडावर भगवा रोवू!
“या देशाची वाट या लोकांनी लावली. आता शिवसेना संपवण्याची वाट पाहत आहेत. अरे तुम्ही कितीही स्वप्नं पाहा, शिवसेना तुमच्या भ्रष्टाचाराला संपवून तुमच्या छाताडावर नाही भगवा रोवला तर नाव नाही सांगणार,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
हिंदी सक्ती करून दाखवाच!
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “हिंदी सक्ती करण्याची काय गरज? हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठी माणसांमध्ये भांडण लावण्याचा हा कार्यक्रम भाजपने केला. म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे. हिंदी सक्ती करायची असेल तर देवेंद्र करूनच बघा,” असे थेट आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.