उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिले. लोकसभेतलं अनेक घटकांचं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Published on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीनं दमदार कामगिरी करत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघांपैंकी ३० मतदारसंघांत विजय मिळवला. त्याचवेळी महायुतीला मात्र १७ जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. महायुतीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा या तीनही पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिले. लोकसभेतलं अनेक घटकांचं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिले. लोकसभेतलं अनेक घटकांचं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र आली. पण बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही."

ज्या पक्षाच्या जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री-

विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतून लढवायचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी भूमिका घेण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांसह काँग्रेसचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in