

मुंबई : हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला असून मंगळवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर, अनेक जिल्ह्यांना गारपीठीचा तडाखा बसला आहे. पुणे, नाशिक, जळगाव, धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता अशातच हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओलसर वारे सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला आहे. मंगळवारी सकाळी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, रायगड परिसरात अचानक झालेल्या रिमझिम पावसाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
६ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि विखुरलेल्या गडगडाटासह पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
जळगांवमध्ये विजांचा कडकडाट
जळगावमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जळगावसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसापासून निफाडसह येवला तालुक्यात परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात शेती पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेणच्या जोहे हमरापूर भागात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्ट्या तसेच गणपती कारखान्यांचे नुकसान झाले. पुण्यातही पाऊस पडला आहे.
धुक्याची चादर, हवेत गारठा
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही ढगाळ वातावरण राहणार असून, नाशिक, धुळे, जळगाव परिसरात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सध्या ताशी २५ ते ३० किमी वेगाने आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. याच वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून, पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील तुरळक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पाऊस
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. पावसासोबत गारपीटही झाल्याने नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. अवकाळी पावसामुळे गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.