वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे न्यायालयाने आरोपींचा जामीन नाकारला आहे. पुणे सत्र न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवत सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच, जामीन दिल्यास पुरावे नष्ट होऊ शकतात असे न्यायालयाने स्पष्ट केले.
वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...
Published on

पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे न्यायालयाने आरोपींचा जामीन नाकारला आहे. पुणे सत्र न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवत सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच, जामीन दिल्यास पुरावे नष्ट होऊ शकतात असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय २१), नीलेश शशांक हगवणेचा मित्र रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) या आरोपींचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

हुंडाबळी समाजासाठी कलंक - न्यायालय

या सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी कठोर शब्दांत निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, “हुंडाबळी हा समाजासाठी मोठा कलंक आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कटकारस्थान, आत्महत्येला प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपवणे यासारखे गंभीर आरोप आहेत.”

न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, जर आरोपींना जामीन दिला तर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो किंवा पुरावे नष्ट करण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आरोपींना जामीन देणे समाजहितालाही बाधक ठरू शकते.

वैष्णवीचा आत्महत्येपूर्वीचा छळ

१६ मे रोजी भुकूम (ता. मुळशी) येथील मुक्ताई गार्डनजवळ राहणारी वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपासादरम्यान स्पष्ट झाले की, हुंडा आणि जमीन खरेदीसाठी तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ होत होता. शवविच्छेदन अहवालातही वैष्णवीच्या शरीरावर तब्बल ३० जखमा असल्याचे नमूद झाले आहे. ११ ते १६ मे या दरम्यान तिच्यावर सातत्याने मारहाण व छळ होत असल्याचा आरोप आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

आरोपींनी ॲड. विपुल दुशिंग यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील शिवम निंबाळकर यांनी तीव्र विरोध केला.

सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले की, आरोपी नीलेश चव्हाण हुंड्याच्या प्रत्येक चर्चेला हजर असायचा. त्याने शशांक आणि करिश्माच्या मोबाइलमधील सिमकार्ड नष्ट केली आहेत. कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेशमधील निकटचे संबंध स्पष्ट होतात.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, पोलिस तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in