पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर स्वारगेट येथून बावधन पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटकेवेळी पत्रकारांनी राजेंद्र हगवणे यांना पश्चात्ताप झाला का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हात व मान नकारार्थी हालवली. त्यामुळे त्यांच्या वर्तनात अजूनही पश्चात्तापाची भावना नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे दोघे तळेगाव येथे मटणावर ताव मारताना दिसले, त्यानंतर त्यांनी पुणे ते कोल्हापूर आणि पुन्हा पुण्यात प्रवास केला. या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केले. या पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या आधी राजेंद्र हगवणेची पत्नी लता, मुलगी करिष्मा आणि वैष्णवीचा पती शशांक याला अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे हा मोठा मुलगा सुशील सोबत फरार होता. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४बी, ४९८अ, ३२३ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
मुळशी तालुक्यातील भूकुम येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणेच्या धाकट्या सुनेने वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. परंतु, शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर गंभीर जखमांचे व्रण आढळून आल्याने ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता आता समोर आली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी सासरच्या कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले. त्यांच्यानुसार, लग्नात ५१ तोळे सोने, चांदी आणि फॉर्च्यूनर गाडी दिल्यानंतरही त्यांच्या मुलीचा सातत्याने छळ करण्यात आला. त्यामुळे हा मृत्यू केवळ आत्महत्या नसून खूनच असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रेमविवाहानंतर अत्याचार
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्न अत्यंत थाटात झाले, परंतु लग्नाच्या अवघ्या दोनच महिन्यात सासरच्यांकडून छळ सुरू झाला. सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा, दीर सुशील आणि नवरा शशांक यांनी सतत वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले.
तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, मारहाण करणे, अंगावर थुंकणे, तसेच माहेरहून पैसे, दागिने आणण्यासाठी तगादा लावणे असे अनेक प्रकार तिच्यासोबत घडले. गरोदर असताना तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण वेळेवर मदत मिळाल्याने ती बचावली होती. मात्र त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही.
२ कोटींची मागणी आणि मृत्यू
काही दिवसांपूर्वी वैष्णवीचा पती शशांकने तिच्या वडिलांकडे प्लॉट घेण्यासाठी २ कोटी रुपये मागितले. ही रक्कम देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर वैष्णवीवर पुन्हा अत्याचार झाले. आणि त्यानंतर तिच्या आत्महत्येची वार्ता समजली. तिच्या वडिलांनी तिच्या अंगावरच्या जखमा पाहून विचारले तिच्या अंगावर इतक्या जखमा कशा? तर यावर शशांकने ''आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारून टाकलं.'' असे उत्तर दिले.
वैष्णवीचे बाळ माहेरच्यांकडे सुपूर्द
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ पुणे येथील कर्वेनगर येथे राहणारे निलेश चव्हाण याच्याकडे होते. बाळाला आणण्यासाठी वैष्णवीचे आईवडील गेले असता, निलेशने बंदुकीचा धाक दाखवत त्यांना हुसकावून लावले होते. अखेर हे बाळ वैष्णवीच्या घरच्यांकडे म्हणजे कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आणि निलेश चव्हाण याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निलेश हा वैष्णवीची नणंद करिष्मा हीचा मित्र आहे. तो जामिनावर बाहेर असून त्याच्यावर पत्नीचा छळ आणि तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे आरोप आहेत.
थोरल्या सुनेचेही धक्कादायक आरोप
राजेंद्र हगवणेची थोरली सुन मयुरी हगवणे हिनेही माध्यमांपुढे धक्कादायक आरोप केले. तिच्यावरही सासरच्या लोकांकडून पैशांसाठी छळ झाल्याचे तिने स्पष्ट केले. नवरा सुशील तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतानाही त्याला घरच्यांकडून दडपणाचा सामना करावा लागला. तिच्या पतीच्या अनुपस्थितीत सासू, सासरे, नणंद आणि दीर यांनी तिच्यावर हात उचलला. मयुरीच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र आणि शशांक हगवणेने तिच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण केली, कपडे फाडले आणि मुलगा होत नाही म्हणून शिवीगाळ केली. या भीषण अवस्थेत तिला घरातून पळ काढावा लागला. पौड पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दिली, मात्र केवळ एनसी नोंदवली गेली आणि तिच्यावरही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
राजकीय आणि प्रशासनिक पातळीवर हालचाली
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. ऑडिओ क्लिप तसेच इतर सर्वच गोष्टी तपासून वैष्णवीला न्याय मिळवून दिला जाईल. वैष्णवी मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादी काँग्रेसमधून तात्काळ हकालपट्टी केली. "नालायक प्रवृत्तीची माणसं पक्षात नको. दोषींवर कारवाई केली जाईल आणि पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल," अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली.
केंद्रीय महिला आयोगानेही प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांना निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ''पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. आयोगाच्या वतीने कठोर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे'' अशी प्रतिक्रिया दिली.
"वैष्णवीच्या अंगावर आढळलेल्या जखमा पाहता हा मृत्यू आत्महत्या वाटत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.