वंचितला अद्यापही इंडिया आघाडीचे निमंत्रण नाही

आम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही निमंत्रण प्राप्त झाले नसल्याचे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
वंचितला अद्यापही इंडिया आघाडीचे निमंत्रण नाही

मुंबई : प्रकाश आंबेडकरप्रणीत वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे, मात्र अद्यापही वंचितचा मुख्य इंडिया आघाडीत समावेश होणार किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. काही वृत्तवाहिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा हवाला देऊन वंचितला इंडिया आघाडीत सहभागासाठी निमंत्रण पाठविल्याच्या बातम्या चालविल्या गेल्या, मात्र वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या बातम्यांचे पूर्णपणे खंडन केले असून अद्याप तरी आम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही पत्र किंवा निमंत्रण प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. भाजपला देशात आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांचा इंडिया आघाडीत समावेश आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा इंडियातील प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील पत्र लिहिले होते. मात्र पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार असल्याचेही जाहीर केले आहे.

गुरुवारी काही वृत्तवाहिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हवाल्याने वंचितला इंडिया आघाडीत प्रवेशाचे निमंत्रण देण्याची बातमी चालविण्यात आली, मात्र वंचितकडून याचे खंडन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविल्याच्या खोट्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर चालविण्यात येत आहेत. अद्याप आम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही.

खोडसाळ प्रचार थांबवावा

आमची विनंती आहे की, सूत्रांच्या किंवा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या हवाल्याने या बातम्या देण्याऐवजी वृत्तवाहिन्यांनी त्या सूत्रांना किंवा बड्या नेत्यांना कॅमेऱ्यासमोर माहिती देण्यास सांगावे आणि मग बातम्या दाखवाव्यात. वंचित बहुजन आघाडीबद्दल सुरू आलेला खोडसाळ प्रचार थांबवावा.

रेखा ठाकूर, वंचितच्या प्रदेशाध्यक्ष

logo
marathi.freepressjournal.in