वंचित आघाडीचे ‘एकला चलो रे’! ३ उमेदवारांची घोषणा, महाविकास आघाडीशी बोलणी फिस्कटली?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडी मजबुतीने महायुतीविरोधात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार होती. परंतु
वंचित आघाडीचे ‘एकला चलो रे’! ३ उमेदवारांची घोषणा, महाविकास आघाडीशी बोलणी फिस्कटली?
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडी मजबुतीने महायुतीविरोधात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार होती. परंतु महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर नाराज असून, त्यांनी रविवारी थेट अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित करत ‘एकला चलो’चा नारा दिला.

प्रकाश आंबेडकर, राजेंद्र साळुंखे आणि चंद्रहार पाटील रिंगणात

रविवारी दुपारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात अचानक पत्रकार परिषद बोलावली आणि अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. यासोबतच वर्धा येथून प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून पहेलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आंबेडकर यांनी ‘एकला चलो’चा नारा दिल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या या धक्कातंत्रामुळे महाविकास आघाडीसमोर आता तगडे आव्हान उभे ठाकणार आहे. दरम्यान, ॲड. आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी ६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात आणि त्यानंतर ॲड. आंबेडकर दोन पावले मागे घेतात का, यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जागावाटपाची बोलणी अद्याप सुरूच आहेत. ४८ पैकी ३३ जागांवर त्यांच्यात एकमत झाले आहे. मात्र, १५ जागांवरून त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यावर वरिष्ठ तोडगा काढतील, असे चित्र असतानाच वंचित आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला नवनवे प्रस्ताव देऊन संशयाला बळ दिले. मात्र, त्यांच्या बऱ्याच प्रस्तावांबाबत महाविकास आघाडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु जास्तीत जास्त जागांची अपेक्षा वाढल्याने आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेते ६ मार्च रोजी अ‍ॅड. आंबेडकर यांची भेट घेऊन चर्चा करणार होते. तसे त्यांनाही कळवण्यात आले असून या चर्चेतून तोडगा निघेल, असे वाटत होते.

वंचित आघाडी जर स्वबळावर लढली, तर महाविकास आघाडीची अडचण वाढू शकते. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारीमुळे आघाडीच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आताही तेच झाल्यास भाजपचे ‘मिशन ४५’चे स्वप्न सहज साकार होऊ शकते, असे बोलले जात आहे. मात्र, शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in