

कल्पेश महामुणकर/ मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा पुत्र तथा माजी नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत गिरिजा राऊत यांनी सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक छळ झाल्याचा आरोप केला. उपचाराच्या नावाखाली २०१८ ते २०२२ या कालावधीत कथित अघोरी विधी करण्यास भाग पाडण्यात आले. विविध ठिकाणी मांत्रिकांकडे नेऊन जादूटोण्याचे प्रकार करण्यात आले, तसेच योग्य वैद्यकीय उपचारांऐवजी अंधश्रद्धाजन्य उपायांचा अवलंब केल्याने आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला. कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचा वापर करून धमकावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरही कुटुंबप्रमुख म्हणून परिस्थितीची माहिती असूनही त्यांनी हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केला.
हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित
विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. गितेश आणि गिरिजा गेली तीन वर्षे वेगळे राहत असून, जुने आरोप आता का करण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित असून, पोटगी व सेटलमेंटच्या मोठ्या आर्थिक मागण्या मान्य न झाल्यानंतरच फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जादूटोणा किंवा अघोरी प्रथांशी आपल्या कुटुंबाचा कोणताही संबंध नसून, न्यायालयात कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.