

सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असताना विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली. बुधवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला. यामध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या इमारतीत एका चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या पार्टीचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
जो चौथा मजला कोसळला, त्या ठिकाणी उत्कर्षा जॉयल या चिमुकलीचा एक वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जॉयल कुटुंबियांचे आप्तेष्ट जमले होते.
आरोही आणि ओंकार आपल्या मुलीच्या वाढदिवसात व्यस्त होते. घर फुगे आणि दिव्यांनी सजले होते. पाहुणे नाचत आनंद साजरा करत होते. पण, काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं. उत्सवाचे रूपांतर शोकांतिकेत बदलले. ढिगाऱ्याखालून आरोही व तिची मुलगी बाहेर काढण्यात आली, मात्र रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. वडील ओंकार जॉयल यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या कार्यक्रमातील अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले तर काहींचा मृत्यूही झाला.
इमारतीच्या कोसळलेल्या भागात १२ फ्लॅट होते. अपघातानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन विभाग व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गर्दीच्या भागामुळे जड यंत्रणा आत नेण्यात अडचणी आल्या आणि सुरुवातीला बचावकार्य हातानेच करावे लागले. सुमारे ३० तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगारा हटवण्यात आला. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत.
२०१२ मध्ये बांधलेल्या रमाबाई अपार्टमेंटमध्ये सुमारे ५० फ्लॅट होते. वसई-विरार महानगरपालिकेने (VVMC) या इमारतीला 'बेकायदेशीर' घोषित केले आहे. दुर्घटनेनंतर बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनीही 'निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर बांधकाम' यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जिल्हा प्रशासनाने आजूबाजूच्या इमारती खबरदारी म्हणून रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बेघर झालेल्या कुटुंबांना चंदनसर समाजमंदिरात तात्पुरती सोय करून देण्यात आली असून, अन्न, पाणी, वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
इमारतीत कोणत्याही भेगा वा इशारे न दिसता अचानक कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकामे व इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.