येत्या जानेवारी महिन्यात साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज (दि. १४) पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
या पदासाठी सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज साहित्यिकांची नावे चर्चेत होती. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, अभिजात भाषेच्या दर्जासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे, तसेच बाळ फोंडके यांची नावेही पुढे आली होती. मात्र, नेमाडे यांनी पूर्वीच नकार दिल्याने विश्वास पाटील यांच्या नावाची निवड होणार, अशी चर्चा होती. अखेर आजच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाले.
विश्वास पाटील यांची साहित्यसंपदा
विश्वास पाटील हे मराठीतील नामवंत व लोकप्रिय कादंबरीकार मानले जातात. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रभावी लिखाण केले आहे. ‘पानिपत’ ही मराठ्यांचा पानिपतच्या युद्धावर आधारित गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. या सोबतच त्यांची झाडाझडती, सिंहासन, चंद्रमुखी, महाड, स्मरणगंध ही ग्रंथसंपदाही प्रसिद्ध आहे.
त्यांच्या लेखनशैलीत सखोल संशोधन, प्रभावी भाषा, नाट्यमयता आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन ही वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात.