बारामतीचा गड आम्हीच राखणार! अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांचा दावा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा गड आम्हीच राखणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी सोमवारी केला
बारामतीचा गड आम्हीच राखणार! अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांचा दावा

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा गड आम्हीच राखणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी सोमवारी केला. त्यांनी दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला सोमवारी भेट देऊन नवशक्ति-फ्री प्रेस वृत्तपत्र समुहाचे संचालक अभिषेक कर्नानी व व्यवस्थापकीय संपादक जी. एल. लखोटिया यांच्याशी विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपल्या पक्षाची भूमिका मांडली.

बहुचर्चित बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडणूक जिंकत आल्या आहेत. याआधी सुप्रिया सुळे यांचा प्रचारसुद्धा अजित पवार व सुनेत्रा पवार करत होत्या. त्यांचा स्थानिकांशीच नव्हे तर स्थानिक संस्थांशीही सातत्याने संपर्क व संवाद आहे. आमची तयारी खूप आधीपासूनच सुरू होती. त्यामुळे बारामतीचा गड आम्हीच जिंकू, असा दावा श्रीवास्तव यांनी केला.

७० हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणीचा अजित पवार यांच्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याचे बजेट १३ हजार कोटीचे असेल, तर ७० हजार कोटीचा घोटाळा कसा शक्य आहे, असा सवालही त्यांनी विचारला.

शरद पवार - राष्ट्रवादी वेगळे करण्याची मोहीम अवघड

शरद पवारांपासून राष्ट्रवादी पक्षाला वेगळे करण्याची मोहीम अवघड होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व बदलले आहे. नव्या नेतृत्वाच्या हाती पक्षाची धुरा गेली आहे. हा संदेश आम्ही आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे प्रयत्न कितपत फलदायी ठरतील हे निवडणुकीनंतरच समजेल. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह मिळाले असले तरी ते टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार डायनॅमिक नेते!

अजित पवार ६५, शिंदे ६०, फडणवीस ५५ वयाचे आहेत. ते राज्यासाठी मोठे कार्य करू शकतील. अजित पवार हे डायनॅमिक, स्पष्टवक्ते, मेहनती आहेत. त्यांची राज्य प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. त्वरित निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. प्रशासकीय कारभार, राजकीय कारभारात ते तरबेज आहेत, असेही ते म्हणाले.

विरोधकांचे अपयश

महागाईचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात विरोधक अपयशी ठरले असल्याचा दावा त्यांनी केला. बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. रोजंदारीवरील मजुरांचे किमान वेतन आता वाढले आहे. उत्पन्नही वाढले आहे. पुन्हा पाच वर्षे मिळाल्यास देश प्रगती करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमचा पक्ष धर्मनिरपेक्षच!

आम्ही भाजपसोबत युती केली असली तरी आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. आमच्या पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाने दिल्लीत मोठा मेळावा घेतला. त्यात पॅलेस्टिनच्या मुद्यावरून इस्त्रायलचा निषेध नोंदविला. आमच्या पक्षाशिवाय अन्य कुणीही असे काम केले नाही. पॅलेस्टिनी राजदूतही या मेळाव्याला हजर होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आताच भाष्य करणे अयोग्य!

महाराष्ट्रासह देशात भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सत्तेवर येईल व त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा जिंकेल याविषयी आताच भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारने मागील दहा वर्षात खूप चांगले काम केले आहे. देशापुढील अनेक प्रश्न प्रदीर्घकाळ प्रलंबित होते. ते प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न मोदी सरकारने केले आहेत. सध्या काश्मीरमध्ये चांगले वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in