मोहन भागवतांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; संघ मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी आंदोलकांना अडवले

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत निषेधार्थ मोर्चा काढला होता.
मोहन भागवत
मोहन भागवत संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत निषेधार्थ मोर्चा काढला होता. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वात नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनमधून निघून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र, विनापरवानगी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्यापासून पोलिसांनी मध्येच रोखले.

‘अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनीही भागवतांवर टीका केली होती. आता युवक काँग्रेसने भागवत यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. संघाने आधी ध्वजाचा अवमान केला, आता स्वातंत्र्याचा अपमान करत आहे, अशा आशयाचे बॅनर घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी संघावर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली.

गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी चिटणीस पार्क चौकावर आधीपासूनच जोरदार बंदोबस्त लावला होता. दरम्यान, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते जास्त संख्येने असल्याने ते पोलिसांना जुमानत नसल्याचे बघून पोलिसांनीही बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हेही उपस्थित होते, तर यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र, पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.

संघावर बंदी घालण्याची मागणी

सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी देशविरोधी वक्तव्य करून, सरदार भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादींसह अनेक क्रांतिकारकांचा अवमान केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांनी केली. स्वातंत्र्यसैनिकांच्या अपमानाविरोधात युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरली आहे. यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या थोर महापुरुषांचा अवमान केला आहे. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच संघावर बंदी घालावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in