बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी १३०० बसेस; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती, कुर्ला अपघाताचे विधिमंडळात पडसाद

बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा वाढवावा यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १३०० बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी १३०० बसेस; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती, कुर्ला अपघाताचे विधिमंडळात पडसाद
Published on

नागपूर : बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा ताफा वाढवावा यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात १३०० बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३०० बसेसचा पुरवठा करण्याची वर्क ऑर्डर दिलेली असून लवकरच या बसेसचा ‘बेस्ट’च्या ताफ्यात समावेश होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनात दिली. बेस्ट उपक्रम आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त व बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कुर्ला येथील दुर्घटनेतील वाहनचालकाने कोणतीही नशा केली नव्हती, असे निष्पन्न झाल्याचा खुलासा फडणवीसयांनी यावेळी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील बेस्ट अपघातप्रकरणी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी याठिकाणी बेस्ट बसचे अपघात झाले. कुर्ला येथील घटनेत ७ जण दगावले, तर ४२ जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात सोमवारी उमटले. मागील वर्षभरात बेस्टचे २४७ अपघात झाले. अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला, याबद्दल सुनील शिंदे यांनी चिंता व्यक्त केली.

अनेक बसेसचे आर्युमान संपल्याने अपघातात वाढ

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या आर्युमान संपलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आल्याने अपघातात वाढ झाली आहे. नवीन बसगाड्या खरेदीसाठी बेस्ट परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. परिणामी, मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेत आयुर्मान संपलेल्या बसगाड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन मांडत, सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी सुनील शिंदे यांनी यावेळी केली.

बेस्ट बसेसने दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बेस्ट बसेसच्या अपघातात वाढ झाली असून ही गंभीर बाब आहे. सरकार यावर नक्कीच गांभीर्यपूर्वक चर्चा करेल. कुर्ला येथे जो अपघात घडला त्यासंदर्भात बसचालकाने मद्यप्राशन केले का याची तपासणी केली. परंतु तपासणीत तसे काहीही आढळलेले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश

तरी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत चालकांची अचानक तपासणी सुरू केली गेली आहे. या अपघातातील सर्व वस्तुस्थिती जाणून घेऊन बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्तांना बेस्टच्या महाव्यवस्थापकाबरोबर चर्चा करत योग्य उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

logo
marathi.freepressjournal.in