
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या तब्बल ४४० हून अधिक अर्जदारांनी घरे परत केली आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी मिळणार आहे. लॉटरीत विजेते ठरले नसल्याने निराश झालेल्या प्रतीक्षा यादीतील अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने शहर आणि उपनगरातील विविध योजनेतील २ हजार ३० घरांच्या विक्रीची लॉटरी जाहीर केली होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १ लाख ३४ हजार ३५० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.
यापैकी १ लाख १३ हजार ८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून लॉटरी प्रक्रियेत सहभाग निश्चित केला होता. या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या अनेकांना एकाहून अधिक घरे लागली. म्हाडाच्या नियमानुसार लॉटरीत एकाहून अधिक घरे लागल्यास एकच घर घ्यावे लागते. त्यानुसार अधिक घरे लागलेल्या विजेत्यांना एक घर पसंत करून दुसरी घरे परत करण्याची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये ४४० हून अधिक विजेत्यांनी घरे परत केली आहेत. त्यामुळे मंडळामार्फत प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात येणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील अर्जदारांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्यासाठी अनेक जण म्हाडामार्फत विक्री होणाऱ्या घरांना पसंती देतात. यासाठी म्हाडाच्या लॉटरीला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतो. या घरांसाठी अनेकजण एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. मुंबईत विविध ठिकाणी म्हाडामार्फत घरांच्या लॉटरी काढल्या जातात.
...तर ही घरे पुढील सोडतीमध्ये समाविष्ट करणार
प्रतीक्षा यादीतील अर्जदारांनीही घरे नाकारल्यास ही घरे पुढील वर्षी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.