मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसवण्याची तयारी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची राजकीय नाकेबंदी करण्याची खेळी केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. अहिर यांना सत्तेतील पदाच्या माध्यमातून बळ देत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे.
अहिर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदावर होते. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून अहिर यांचे पक्षात स्वागत केले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून अहिर यांचा पराभव करून निवडून आलेल्या सुनील शिंदे यांनी २०१९मध्ये आदित्य यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सोडला होता. सुनील शिंदेनी घेतलेली माघार आणि अहिर यांची साथ यामुळे २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीवर पाणी सोडणाऱ्या सुनील शिंदे आणि अहिर यांची नंतर पक्षाने विधान परिषदेवर वर्णी लावली. सचिन अहिर हे जुलै २०२२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र, त्यानंतर लगेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडावेळी अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्याने अनेकांप्रमाणे अहिर यांनाही पुढील राजकीय भवितव्याची चिंता सतावत होती. अहिर यांची विधानपरिषदेची मुदत जुलै २०२८ मध्ये संपत आहे. ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता अहिर यांना विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत साशंकता होती. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले.
आता सत्तेच्या माध्यमातून पुन्हा वरळी मतदारसंघात बस्तान बसवण्याचे प्रयत्न अहिर यांच्याकडून होणार आहे. सत्तेतून बाहेर गेल्यापासून अहिर यांनी वरळीतील दहीहंडी उत्सवाचे आयोजन बंद केले होते. आता २०२९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अहिर हे वरळीत पुन्हा सक्रिय होऊ शकतात. २०२४ च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांच्याविरोधात कमी मताधिक्क्याने निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांना आता २०२९ च्या निवडणुकीत सचिन अहिर यांचे आव्हान असणार आहे.
वरळी मतदारसंघातून लढण्याबाबत स्पष्टीकरण
सचिन अहिर आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीतून आपल्याविरोधात लढतील का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "त्यांच्या लढण्याने काही फरक पडणार नाही. त्यांनी मला आज सकाळी संदेश पाठवला आहे की ते माझ्या विरोधात लढणार नाहीत. पण हे फक्त बोलण्यापुरते असते." तसेच, अहिर यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असेही त्यांनी संकेत दिले.