Mahaparinirvan Din 2025 : इंदू मिलमध्ये साकारतंय डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक, जगातील तिसऱ्या क्रमांकाची कांस्य मूर्ती; जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील दादर-पश्चिम येथील १२ एकर इंदू मिल परिसरात उभारत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वाहिलेले हे स्मारक आधुनिक तंत्रज्ञान, बौद्ध वास्तुशैली आणि भारताच्या सामाजिक इतिहासाचा संगम ठरणार आहे.
इंदू मिलमध्ये साकारतंय डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक,  जगातील तिसऱ्या क्रमांकाची कांस्य मूर्ती; जाणून घ्या सविस्तर
इंदू मिलमध्ये साकारतंय डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक, जगातील तिसऱ्या क्रमांकाची कांस्य मूर्ती; जाणून घ्या सविस्तर
Published on

मुंबईतील दादर-पश्चिम येथील १२ एकर इंदू मिल परिसरात उभारत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वाहिलेले हे स्मारक आधुनिक तंत्रज्ञान, बौद्ध वास्तुशैली आणि भारताच्या सामाजिक इतिहासाचा संगम ठरणार आहे. ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील भूमिपूजन करण्यात आले होते.

स्मारक कोण उभारत आहे?

स्मारक उभारणीची जबाबदारी शापूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएच्यावतीने ईपीसी कंत्राटदार म्हणून ते पूर्ण करत आहेत.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंच मूर्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कांस्यमय मूर्ती हे संपूर्ण स्मारकाचे मुख्य आणि भव्य आकर्षण ठरणार आहे. ३५० फूट उंच मूर्ती आणि १०० फूट उंच पायथा मिळून ही रचना तब्बल ४५० फूट उंच भव्य स्मारकात परिवर्तित होत आहे. ही मूर्ती घडविण्याचा मान महाराष्ट्र भूषण आणि जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांना मिळाला आहे. त्यांच्या कुशल हातांनी आकारलेली ही मूर्ती उंची, सौंदर्य आणि विचारांच्या भव्यतेचे प्रतीक ठरेल. पूर्ण झाल्यानंतर ही शिल्पकला जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून इतिहासात नोंदवली जाणार आहे.

आर्थिक खर्च

या भव्य स्मारकाचा संपूर्ण प्रकल्प आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत व्यापक आहे. एकूण ८०० कोटी खर्चात हे स्मारक उभारले जात असून दादर-पश्चिम येथील १२ एकर विस्तीर्ण इंदू मिल परिसरात त्याची निर्मिती सुरू आहे. प्रकल्पातील उंच मूर्ती, ध्यानगृह, संग्रहालय, लायब्ररी, उद्यान आणि अत्याधुनिक सुविधांमुळे हा बांधकामकामाचा टप्पा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या संपूर्ण काम वेगाने प्रगतीपथावर असून मुंबईच्या समुद्रकिनारी उभे राहणारे हे स्मारक राष्ट्रीय अभिमानाचे नवीन प्रतीक ठरणार आहे.

प्रमुख आकर्षण आणि अंतर्गत सुविधा

१) ध्यानगृह (चैत्य) - २५,००० चौ. फूट

  • बौद्ध वास्तुशैली

  • कमळाच्या तळ्याभोवती घुमट

  • बुद्धाच्या अष्टमार्गाचे प्रतीक असलेले ८-स्तरीय कांस्य छप्पर

  • शीर्षस्थानी अशोक चक्र

२) मेमोरियल लायब्ररी - ५०,००० चौ. फूट- महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ आणि संशोधन साहित्य याठिकाणी उपलब्ध असेल.

३) परस्परसंवादी संग्रहालय - ४०,००० चौ. फूट- बाबासाहेबांचा जीवनप्रवास, सामाजिक क्रांती आणि संविधाननिर्मितीचा अनुभव तंत्रज्ञानातून साकारणार आहे.

४) १,००० क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह- व्याख्यान, कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध असणार आहे.

५) ‘संघर्षाची गॅलरी’- बाबासाहेबांच्या जीवनातील निर्णायक घटना याठिकाणी दाखवल्या जातील.

६) मेमोरियल पार्क- १२ एकरात बौद्ध थीम पार्क तयार करण्यात येणार आहे.

७) पार्किंग- ४०० गाड्यांची क्षमता असणारे दोन मजली पार्किंग एरिया बनवण्यात येणार आहे.

इंदू मिल परिसराचा इतिहास काय?

इंदू मिल ही कापड उद्योगातील ऐतिहासिक गिरणी होती. गिरणी कामगार चळवळीशी निगडित असलेल्या या जागेचे औद्योगिक महत्त्व मोठे आहे. मिल बंद पडल्यावर सामाजिक चळवळीच्या मागणीनुसार ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राखून ठेवण्यात आली. आज ती जागा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे राष्ट्रीय केंद्र बनत आहे.

स्मारकाची सद्यस्थिती काय?

सध्या स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे आणि पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनारी उभे राहणारे हे स्मारक समानता, न्याय आणि मानवतेचे भव्य प्रतीक ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in