

सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साटम हे रेल्वे स्टेशनवर कामगारांचे बूट पॉलिश करताना दिसून येत आहेत. अमित साटम यांच्या या कृतीवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित (२२ डिसेंबर) रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या कार्यक्रमात साटम उपस्थित होते. यावेळी त्यांनी कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, दैनंदिन संघर्ष आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या कार्यक्रमातील वायरल होणाऱ्या व्हिडिओत अमित साटम हे रेल्वे बूट पॉलिश कामगारासोबत संवाद साधून त्याचे बूट साफ करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सहानुभूती नव्हे, ठोस कृती हवी
या कार्यक्रमानंतर सोशल मीडिया X वर पोस्ट शेअर करत अमित साटम म्हणाले,
“मुख्य प्रवाहात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या मेहनतकऱ्या वर्गाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि सन्मानाने जगण्याचा दर्जा याबाबत मार्गदर्शन केले.”
ते पुढे म्हणाले, “कामगारांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नाही, तर ठोस कृतीच्या माध्यमातून पाहिले पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.”
ऑगस्टमध्ये मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी
ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
राजकारणापूर्वी कॉर्पोरेट अनुभव
१५ ऑगस्ट १९७६ रोजी मुंबईत जन्मलेल्या अमित साटम यांनी मुंबई विद्यापीठातून राजकीय शास्त्र व समाजशास्त्रात पदवी, तसेच एमएमएसमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये HR तज्ज्ञ म्हणून काम केले होते.
नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज
अमित साटम यांनी यापूर्वी जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पावसाळ्यापूर्वी निविदा प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली होती. कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे आणि युटिलिटी कॉरिडॉरद्वारे पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी सुधारणा करण्यासाठी आवाज उठवला होता. बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीबाबत चिंता व्यक्त करत नजरकैद केंद्रे आणि फास्ट-ट्रॅक न्यायालयांची मागणी अशा विविध मुद्द्यांवर सातत्याने भूमिका मांडली आहे.
कामगार वर्गाशी थेट संवाद साधत सन्मान व्यक्त करणाऱ्या या कृतीमुळे अमित साटम यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.