'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल

पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी ३० दिवसांचा मोठा ब्लॉक सुरू आहे. या ब्लॉकमुळे दररोज सुमारे २०० ते ३५० लोकल फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे आधीच गर्दीने त्रस्त असलेल्या प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे.
अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी
अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी
Published on

मुंबई : पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या महिनाभराच्या मोठ्या ब्लॉकमुळे मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंधेरी स्थानकावरील गोंधळ आणि धोकादायक परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

३० दिवसांचा मोठा ब्लॉक; १८ जानेवारीपर्यंत परिणाम

पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी ३० दिवसांचा मोठा ब्लॉक सुरू आहे. हा ब्लॉक डिसेंबर अखेरीस सुरू झाला असून १८ जानेवारी २०२६ पर्यंत तो चालणार आहे. यामुळे उपनगरीय लोकल सेवांवर मोठा परिणाम झाला आहे.

दररोज शेकडो लोकल रद्द, लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही फटका

या ब्लॉक दरम्यान दररोज सुमारे २०० ते ३५० लोकल फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे आधीच गर्दीने त्रस्त असलेल्या प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. अंधेरी आणि बोरीवलीसारख्या मोठ्या स्थानकांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसतोय. या ब्लॉकचा परिणाम केवळ लोकल सेवांपुरता मर्यादित राहिलेला नाही. अहमदाबाद-बोरीवली एक्सप्रेससारख्या मेल-एक्सप्रेस गाड्याही वसई रोडसारख्या स्थानकांवरच थांबवल्या जात आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची मोठी गैरसोय होत आहे.

अचानक प्लॅटफॉर्ममध्ये बदल, प्रवाशांची तारांबळ - Video व्हायरल

अंधेरी स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाकडून अचानक फलाटांमध्ये बदल केला जात असल्यामुळे लोकल पकडण्यासाठी फूट ओव्हरब्रिजही प्रवाशांनी खचाखच भरून जातो. प्लॅटफॉर्मवर उभं राहायलाही जागा नाही, फूट ओव्हरब्रिजचीही तिची स्थिती, त्यामुळे अनेकांना जीव धोक्यात घालून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी थेट रेल्वे रुळावर उतरावं लागतंय, अंधेरी स्थानकाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अचानक होणाऱ्या प्लॅटफॉर्म बदलांमुळे अनेक प्रवासी फूट ओव्हरब्रिजवरून धावताना, तर काही जण थेट रुळ ओलांडून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अचानक होणाऱ्या प्लॅटफॉर्म बदलांमुळे अनेक प्रवासी फूट ओव्हरब्रिजवरून धावताना, तर काही जण थेट रुळ ओलांडून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

"अपघात होईपर्यंत वाट पाहणार का?" - संतप्त प्रवाशांचा सवाल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे. गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी पुरेशा प्रमाणात नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात असून, “मोठ्या दुर्घटनेची वाट बघताय का?” असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. तर, सहावी लाईन पूर्ण झाल्यानंतर भविष्यात प्रवासी क्षमतेत वाढ होईल आणि गर्दी कमी होईल, असं पश्चिम रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, सध्याची परिस्थिती प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचं चित्र आहे. ब्लॉकच्या काळात योग्य नियोजन, वेळेवर माहिती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in